अखेर चौधरी चहा थर्मासमध्येच झाला गार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:09 IST2019-04-23T12:09:37+5:302019-04-23T12:09:55+5:30
नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या चौधरी चहाचे कितीही कौतुक केले असले तरी प्रत्यक्षात या चहावाले चौधरी बाबांना ...

अखेर चौधरी चहा थर्मासमध्येच झाला गार...
नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या चौधरी चहाचे कितीही कौतुक केले असले तरी प्रत्यक्षात या चहावाले चौधरी बाबांना पोलिसांनीच बाहेर रोखल्याने त्यांचे पंतप्रधानांना चहा पाजण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी एका व्हीडीओ कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात नंदुरबारच्या चौधरी चहाचे कौतुक केले होते. आपण स्वत: ही चहा या भागात आल्यानंतर आवर्जून प्यायचो, असेही सांगितले होते. त्यांच्या या कौतुकाने नंदुरबारचे चौधरी चहा विक्रेते रामदास चैत्राम चौधरी हे चर्चेत आले होते. पंतप्रधानांना एकवेळा चहा पाजावा, असे त्यांचे स्वप्न होते. त्यानुसार २२ एप्रिलच्या नंदुरबार येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत त्यांना उत्सुकता लागून होती. या दौऱ्यात आपले स्वप्न पूर्ण होईल असा आशावाद त्यांना होता. त्यासाठी पूर्वसंध्येला त्यांनी सभेतील प्रवेश व मोदी यांना भेटण्यासाठी पास मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पास त्यांना मिळाला नाही. तरीही त्यांच्यासाठी स्पेशल चहा बनवून ते सभास्थळी गेले. परंतु पोलिसांनीच प्रवेश नाकारल्याने त्यांचा चहा थर्मासमध्येच गार झाला. विशेष म्हणजे सभेच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी चौधरी चहाचे तोंड भरुन कौतुक करीत त्यातून नंदुरबारशी जुळलेले नाते सांगत होते. आपले हे कौतुक रामदास चौधरी मात्र रखरखत्या उन्हात सभा मंडपाबाहेरच ऐकत होते.