कोळदा, खापर, कोपर्ली आणि अक्कलकुवा गटात उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:04+5:302021-07-04T04:21:04+5:30
११ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २ जुुलै रोजी ...

कोळदा, खापर, कोपर्ली आणि अक्कलकुवा गटात उमेदवारी अर्ज दाखल
११ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २ जुुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निवडणुका घेण्याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित होता; परंतु आता सुनावणी ६ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. त्यातच ५ जुुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणे आवश्यक असल्याने इच्छुकांनी तशी तयारी करून ठेवली आहे. भाजप, शिवसेना व काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली. शनिवारी राष्ट्रवादीने देखील ती प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे.
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या लहान कन्या डॉ. सुप्रिया गावित यांच्या उमेदवारीबाबत आधीपासूनच चर्चा होती; परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होते किंवा कसे, याकडे लक्ष लागून होते. शुक्रवारी त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले होते; परंतु गट कोणता राहील याबाबत साशंकता होती. अखेर कोळदा गटातून त्यांनी सकाळी भाजपतर्फे अर्ज दाखल केला. त्यानंतर त्या तडक अक्कलकुवा येथे गेल्या, तेथे त्यांनी खापर गटातून देखील भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात तो चर्चेचा विषय ठरला. त्यांच्यासोबत खा. डॉ. हीना गावित व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. आता त्यांच्या विरोधात कोण उमेदवारी करतो, याकडे लक्ष लागून आहे.
माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र व माजी जि.प. उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी गेल्या निवडणुकीत राजकारणात प्रवेश केला होता. कोपर्ली गटातून ते निवडून आले होते. यावेळीदेखील ते कोपर्ली गटातूनच उमेदवारी करतील, हे निश्चित होते. त्यानुसार त्यांनी शनिवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपतर्फे या ठिकाणी कुणाला उमेदवारी दिली जाते, याकडे लक्ष लागून आहे.
शहादा तालुक्यातील म्हसावद, पाडळदा व लोणखेडा गटाकडे देखील लक्ष लागून आहे. म्हसावद गटात माजी सभापती अभिजित पाटील यांची काँग्रेसतर्फे उमेदवारी निश्चित आहे. लोणखेडा गटात माजी सभापती जयश्री पाटील यांचीही उमेदवारी भाजपतर्फे निश्चित आहे. पाडळदा गटात धनराज पाटील हेच भाजपतर्फे उमेदवार राहणार आहेत.