कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:49+5:302021-08-23T04:32:49+5:30
नंदुरबार : लहान बालकांना गोवर होण्याचा सर्वाधिक धोका असतो. यातून शासनाने तीन वर्षांपूर्वी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरु केली होती. ...

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर !
नंदुरबार : लहान बालकांना गोवर होण्याचा सर्वाधिक धोका असतो. यातून शासनाने तीन वर्षांपूर्वी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरु केली होती. या मोहिमेंतर्गत १०० टक्के लसीकरण केले गेले असून येत्या काळातही बालकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गोवर व रुबेला हे विषाणूजन्य आजार असून लहान बालकांना त्याचा अपाय होऊ शकतो. जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे १०० टक्के गोवर व रुबेलाचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, गोवर केवळ लहान बालकांनाच होतो असा सर्वसाधारण समज आहे; परंतु मोठ्या वयोगटातील मुले आणि वरिष्ठ वयोगटातील नागरिकांना गोवर होण्याचा धोका आहे. ताप येणे, चेहऱ्यावर लाल पुरळ येणे ही गोवरची लक्षणे आहेत. जिल्ह्यात सर्वच बालरोग तज्ज्ञ तसेच शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध आहे.
असे होते निदान
कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप व पुरळ आल्यापासून २८ दिवसांच्या आत गोवर, रुबेलाची तपासणी करणे आवश्यक आहे.
शरीरावर पुरळ आल्यापासून सात दिवसांच्या आत रुग्णाचे रक्त नमुने तसेच घशाचा स्वॅब आणि लघवीचे नमुने तपासले जातात यातून अचूक निदान होते.
आरोग्य विभाग व खासगी प्रयोगशाळेत या तपासण्या केल्या जात असल्याची माहिती आहे.
गोवर-रुबेलाची लसीकरण मोहीम शासनाने २०१८ मध्ये सुरु केली होती. याअंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आधीच कुपोषणाची समस्या गंभीर आहे. यातून मग इतर आजारांच्या विळख्यात मुले येऊ नयेत, यासाठी इतर आजारांच्या लसीकरणावर अधिक भर देण्यात येत आहे.
...तर डाॅक्टरांना दाखवा
गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. प्रारंभी ताप येणे, सोबत खोकला, नाक वाहते तसेच डोळ्यांची जळजळ होणे अशी लक्षणे लहान मुलांना दिसून येतात. ही लक्षणे दिसल्यास तत्काळ डाॅक्टरांकडे दाखवणे गरजेचे आहे.
सामान्यपणे तीन ते पाच दिवसानंतर चेहऱ्यावर लाल पुरळ येतात. अशी लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे असे सांगण्यात येते. गोवर योग्य उपचारांनी बरा होतो.
शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येत नाहीत. आरोग्य विभाग सातत्याने दुर्गम भागात तसेच सपाटीच्या ठिकाणी भेटी देत माहिती घेत आहे. नागरिकांनी बालकांना अशा विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
- डॉ. एन.डी.बोडके,
जिल्हा आरोग्य अधिकारी