कोरोनाच्या दुस-या लाटेची भिती प्रशासनाची उपाययोजनांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 22:05 IST2020-11-19T22:04:56+5:302020-11-19T22:05:02+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून ...

Fear of a second wave of corona speeds up the administration's measures | कोरोनाच्या दुस-या लाटेची भिती प्रशासनाची उपाययोजनांना गती

कोरोनाच्या दुस-या लाटेची भिती प्रशासनाची उपाययोजनांना गती

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज सुरू करण्यात आले असून कोविड हाॅस्पिटल, कोविड केअर सेंटर येथील सुविधांचा आढावा घेत कामकाज गतीमान करण्यात आले आहे. 
ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण संख्या घटल्याने जिल्हाभरातील जीवन पूर्वपदावर आले होते. यातून दिवाळीत उत्साही वातावरण होते. परंतू यातून दुस-या लाटेची भिती असल्याने प्रशासनाने दिवाळी संपताच उपाययोजनांना गती दिली आहे. यात प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयातील आयसीएमआर लॅबमध्ये दिवसाला किमान १४० तपासण्या करण्यात येतील असे नियोजन केले आहे. सद्यस्थितीत लॅबमध्ये १०० पेक्षा अधिक तपासण्या होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभाग एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाकडून फ्ल्यू सदृश आजाराच्या रूग्णांची माहिती मागवणार आहे. यांतर्गत विशेष जनसंपर्क असलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाणार आहे. यात छोटे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरवणारे, वाहतूक व्यवसायातील लोक, मजूर, एसटीचे चालक-वाहक यांची माहिती घेत सर्वेक्षण केले जाणार आहे. यातून कोरोना संसर्ग असल्यास किंवा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती समोर येणार आहे. जिल्हा रुग्णालयात एकूण २००, नवापूर येथे २०, एकलव्य कोविड केअर सेंटर येथे २७०, शहादा येथे १२० तर सलसाडी येथे ५० अशा एकूण ५६० बेड्सची व्यवस्था जिल्ह्यात आहे. यात ९० बेड हे आयसीयू आणि व्हेंटीलेटरसह आहेत. सर्वाधिक ८८ आयसीयू व व्हेंटीलेटर बेड हे नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णाालयात आहेत. एकूण १२२ ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध आहेत. दोन महिन्यांपूर्वी सुरू असलेले खाजगी कोविड केअर सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. येत्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास हे सेंटर्स पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सूचना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात रुग्ण संख्या वाढल्यास होम आयसोलेशन, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग या उपाययोजनांवरही विशेष भर दिला जाणार आहे. 

लाट येऊ नये म्हणून...
कोरोनाची दुसरी लाट येण्यात बाजारपेठेतील निष्काळजीपणा हे प्रमुख कारण ठरण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्याकडून सातत्याने मास्क न लावणारे, थुंकणारे, सोशल डिस्टिन्संग न करणारे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागात साडेतीन हजार नागरीकांवर कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्तांवर थेट गुन्हे दाखल होत असल्याने उपाययोजना करतच नागरीक घराबाहेर पडत आहे. वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पालिकेकडून रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले जात आहे. यामुळे बाजारातील गर्दी नियंत्रणात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सेंटर, डॉक्टर्स, औषधांसाठी तयारी
शासकीय रुग्णालय व कोविड सेंटर्स साठी औषध साठा, सुलभ दरात रेमेडीसिवर यांची आवक आहे. रुग्णालयात काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांना सूचना करुन ठेवल्याने त्यांनी रजाही रद्द केल्या आहेत. 

 प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात सर्वप्रकारच्या सोयी आहेत. दररोज जास्तीत जास्त स्वॅब तपासले जातील याकडे लक्ष देण्यात येत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व सोयीसुविधा आहेत.
डाॅ. के.डी.सातपुते, 
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार. 

Web Title: Fear of a second wave of corona speeds up the administration's measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.