भीती कमी होईना अन् सगेसोयरे भेटीला येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:40+5:302021-09-04T04:36:40+5:30
वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वांनीच मोठा धसका घेतला होता. आता परिस्थितीत सुधारणा ...

भीती कमी होईना अन् सगेसोयरे भेटीला येईना
वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वांनीच मोठा धसका घेतला होता. आता परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने अनेकांच्या मनात मोठी धास्ती आहे. त्यामुळे दूरचे सोडाच अगदी जवळचे नातेवाईकही दुर्मीळ झाल्याची खंत व्यक्त होत आहे. श्रावण महिना म्हटला की, अनेकांकडे पूजाअर्चा सुरू असतात. या काळात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेसाठी व प्रसादासाठी आसपास राहणाऱ्यांसह जवळच्या नातेवाइकांनीही आमंत्रित केले जाते. मात्र, संसर्गाच्या भीतीने अनेक जण प्रसाद घेण्यासाठी जाणे टाळत असल्याचे काही कुटुंबीयांनी सांगितले. ग्रामीण भागासह शहरातही कोरोनाची धास्ती अद्यापही कमी झालेली नाही, हे वास्तव आहे.
उपवासकरूही बनले दुर्मीळ
हिंदू धर्मात एखाद्याचे निधन झाल्यावर तिथीनुसार दर महिन्याला उपवास करून जेवायला बोलविले जाते. हा विधी साधारण अकरा महिने चालतो. त्यानंतर साडेअकरा महिन्याला वर्षश्राद्ध विधी केला जातो. या विधीला नातेवाईक आदरांजली वाहण्यासाठी संबंधितांच्या घरी जातात. जेणेकरून त्यांचे दुःख कमी व्हावे; परंतु आता वर्षश्राद्धालाही मोजकीच मंडळी उपस्थित असते. इतकेच नव्हे तर निधन झालेल्या व्यक्तीच्या महिन्यालाही उपवासकरू मिळणे दुर्मीळ झाल्याचे अनेकांनी सांगितले.
केवळ मोबाइलवरच संभाषण
शहरात राहणाऱ्या बहुसंख्य नागरिकांचे मूळ खेड्यापाड्यात आहे. कोरोना उद्रेकापूर्वी संबंधितांचे एकमेकांकडे मोठ्या प्रमाणावर येणे-जाणे होते. मात्र, दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसह तरुणांचा मृत्यू झाला. यात काही घरांतील कर्तेपुरुष, तर काही घरांतील एकुलत्या एक अपत्यांना जीव गमवावा लागला. ही धास्ती अजूनही कायम आहे. आता स्थिती पूर्वपदावर येऊनही कोणाकडे जाऊन आफत ओढवून घेण्यापेक्षा मोबाइलवर संभाषण करून ख्यालीखुशाली जाणून घेण्याकडे कल वाढला आहे.