पत्नी व मुलीचा खूनप्रकरणी पित्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:22 IST2020-01-01T12:22:40+5:302020-01-01T12:22:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पत्नी व मोठ्या मुलीला गळफास लहान मुलीला गळफास देऊन हत्येचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पित्यास ...

पत्नी व मुलीचा खूनप्रकरणी पित्यास जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पत्नी व मोठ्या मुलीला गळफास लहान मुलीला गळफास देऊन हत्येचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पित्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ आॅक्टोबर २०१६ मध्ये तळोदा येथे हा दुहेरी खून झाला होता़
देविप्रसाद ऊर्फ शशिकांत अवधप्रसाद दिक्षीत असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात शहादा न्यायालयात खटला सुरु होता़ मंगळवारी खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पठाडे यांनी साक्षीपुरावे तपासल्यानंतर शशिकांत दिक्षित यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली़
देविप्रसाद ऊर्फ शशिकांत याचा विवाह २००८ मध्ये उत्तरप्रदेशातील अनामिका ऊर्फ निशू यांच्यासोबत झाला होता़ लग्नानंतर निवेशी आणि संचेती या दोन्ही कन्यांचा जन्म झाला होता़ त्यांच्या जन्मानंतरही शशिकांत हा पत्नीचा छळ करत होता़ सासरच्यांनी हुंडा दिला नाही तसेच अनामिका यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता़
यातून आॅक्टोबर २०१६ मध्ये अनामिका व नात निवेशी या दोघींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची नोंद तळोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती़ दरम्यान धाकटी मुलगी संचेती हिने वडीलांनी आई व बहिणीस गळफास दिल्याची माहिती दिल्यानंतर देवीप्रसाद ऊर्फ शशिकांत विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होता़ याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे यांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले होते़ न्यायालयात सुनावणीदरम्यान सहा वर्षीय मुलगी संचेती हीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली होती़ सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज अॅड़ स्वर्णसिंग गिरासे यांनी पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक साठे व सहायक पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांनी काम पाहिले़
आरोपीला जन्मठेपेसह पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तीन वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे़ खटला सुरु असताना शशिकांत हा जिल्हा रुग्णालयातून फरारही झाला होता़ त्याला मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले होते़