धमकी देऊन पळणाऱ्या पिता पुत्राला प्रकाशा येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:05 IST2020-07-12T12:05:20+5:302020-07-12T12:05:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातून कलसाडी येथून महिलेस धमकी देऊन निघालेले ते दोघे सिव्हिलमधील विनयभंगातील गुन्ह्यात संशयित असलेल्या ...

धमकी देऊन पळणाऱ्या पिता पुत्राला प्रकाशा येथून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातून कलसाडी येथून महिलेस धमकी देऊन निघालेले ते दोघे सिव्हिलमधील विनयभंगातील गुन्ह्यात संशयित असलेल्या वॉर्डबॉयचे वडील आणि भाऊ आहेत़ दोघांना पोलीसांनी प्रकाशा येथून ताब्यात घेत शहादा पोलीस ठाण्यात नेले आहे़
पिडित युवतीने गुन्हा मागे घ्यावा यासाठी संशयित वॉर्डबॉयचे वडील जगदीश गोविंदराव मराठे व भाऊ गणेश जगदीश मराठे हे दोघेही दोन दिवसांपासून एमएच ०८ ई ०५८४ या वाहनाने पिडित युवतीच्या नातलगांचा शोध घेत मडकानी व कलसाडी या गावांमध्ये फिरत होते़ दरम्यान त्यांना पिडितेची आत्या कलसाडी गावात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तेथे जावून फिर्याद मागे घ्या अन्यथा जीवे ठार मारु अशी धमकी दिली़ यानंतर दोघांनी तेथून चारचाकी वाहनासह तेथून पळ काढला होता़ घटनेनंतर महिलेने तातडीने शहादा पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपबिती कथन केली होती़ दरम्यान कलसाडी येथून निघालेल्या दोघांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला होता़ सुमारे तासभर केलेल्या पाठलागानंतर त्यांचे वाहन प्रकाशाजवळ अडवण्यात आले होते़ याठिकाणी बाचाबाची झाल्यानंतर पोलीस दाखल झाले होते़ सायंकाळी उशिरा पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पिता-पुत्राविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ प्रकाशा येथून पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत शहादा येथे आणले असता, संशयित जगदीश मराठे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दोघेही दोन दिवसांपासून शासकीय वाहनातून कलसाडी परिसरात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ ते शासकीय वाहन खरे की खोटे याचा पोलीस तपास करत आहेत़ पुत्रावरचा विनयभंगाचा शिक्का पुसताना पित्यावर विनयभंगाचा गुन्हा झाल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे़