शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:10 IST2021-02-15T12:10:07+5:302021-02-15T12:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी सन्मान ...

शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. मात्र या योजनेपासून बरेच शेतकरी अद्यापही वंचित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आपले नाव आधार प्रमाणिकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले असून आधार प्रमाणिकरण तातडीने करुन घ्यावे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा संदेश शेतकऱ्यांना मोबाईलवर शासनाच्या वतीने पाठविले जात आहे. परंतु अद्यापही हा संदेश काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आपले सेवा केंद्र किंवा बँक शाखेत जाऊन विचारणा करीत आहेत. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना असे मेसेज आले आहेत ते बँकेत गेल्यानंतर त्यांना बँकेचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नाहीत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थित आहे. अद्यापपर्यंत एकाही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या योजनेपासून अद्यापही बरेच शेतकरी वंचित असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली , अशी भावना व्यक्त होत आहे.
अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नसून एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचे नावे बँकेत रक्कम आलेली नाही किंवा मेसेजही देण्यात आलेला नाही. संबंधितांनी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी व कर्जमुक्त करण्यात यावे.
- डॉ.किशोर पाटील, प्रदेश सदस्य, भाजप किसान मोर्चा