युरिया खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ, अनेकवेळा चकरा मारूनही खत मिळत नसल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST2021-06-09T04:37:54+5:302021-06-09T04:37:54+5:30
खते, बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक खत विक्री केंद्रांवर युरिया खत मिळत ...

युरिया खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ, अनेकवेळा चकरा मारूनही खत मिळत नसल्याने नाराजी
खते, बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक खत विक्री केंद्रांवर युरिया खत मिळत नसल्याने खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. अनेकवेळा चकरा मारूनही खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून शेतीची राहिलेली काम करायची की खतासाठी भटकंती करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
ग्रामीण भागात पूर्वीपासूनच युरिया खताला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र रासायनिक खते विक्रेत्यांकडून काही अटींवर युरिया खत दिले जाते. युरियासोबत इतर महागड्या खतांची खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. डीएपी किंवा इतर महागड्या खताची एक थैली घेतली तरच युरियाची एक थैली दिली जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाला असून नाईलाजाने गरज नसताना शेतकऱ्यांना महागडे खतही खरेदी करावी लागत आहे. या जाचक अटीमुळे शेतकरी हैराण झाले असून ऐन पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
धडगाव व अक्कलकुवासारख्या तालुक्यातील ग्रामीण भागात डोंगर टेकड्यांवर घरे असतात. अशा अनेक भागात पाऊस आल्यावर वाहन जाण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी खते खरेदी करून त्याची वाहतूक करतात. पावसाळा सुरू झाल्यावर खतांची वाहतूक करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सद्य:स्थितीत युरिया खताची चढ्या भावाने व मनमानी पद्धतीने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव इतर महागड्या खतांची खरेदी किंवा जास्त पैसे मोजून युरिया खत विकत घ्यावे लागत आहे. या प्रकाराकडे कृषी विभागाने त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.