आष्टे येथील विहीपर्यंत आंबेबारा धरणाचे पाणी पाइपलाइनद्वारे आणण्यास आष्टे येथील शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST2021-06-26T04:21:58+5:302021-06-26T04:21:58+5:30

आष्टे गावाजवळ असलेल्या आंबेबारा धरण १९७४ ते ७५ च्या दरम्यान बांधले गेले. या धरणांचे पाणी पूर्वीपासून स्थानिक शेतकऱ्यांना शेती ...

Farmers in Ashte oppose bringing water from Ambebara Dam through pipeline to Vihi in Ashte | आष्टे येथील विहीपर्यंत आंबेबारा धरणाचे पाणी पाइपलाइनद्वारे आणण्यास आष्टे येथील शेतकऱ्यांचा विरोध

आष्टे येथील विहीपर्यंत आंबेबारा धरणाचे पाणी पाइपलाइनद्वारे आणण्यास आष्टे येथील शेतकऱ्यांचा विरोध

आष्टे गावाजवळ असलेल्या आंबेबारा धरण १९७४ ते ७५ च्या दरम्यान बांधले गेले. या धरणांचे पाणी पूर्वीपासून स्थानिक शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी दिले जात होते; मात्र नंतरच्या काळात नगरपालिकेला पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने या धरणातील पाणी ५० टक्के आरक्षित केले जात होते. नगरपालिकेला पाणी देतानाही लघुपाटबंधारे विभागाने शिवशंकर पाणी पुरवठा आष्टे-आंबेबारा या संस्थेला व स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पालिकेला पाणी देऊन टाकले, असे निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे. वीरचक्र प्रकल्पातून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर या आष्टे योजनेचे पाणी कमी प्रमाणात वापरले जात आहे. आष्टे येथील विहिरापर्यंत सध्या आंबेबारा धरणातून पाटचारीद्वारे पाणी आणले जाते. यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने नगरपालिकेतर्फे यावर्षापासून पाइपलाइनने पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आल्याने यास येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नगरपालिकेला पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही; मात्र ते पूर्वीप्रमाणेच पाटचारीद्वारे न्यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. पाटचारीद्वारे पाणी नेल्यास परिसरातील पशू-पक्ष्यांना तसेच शेतांतील कामे झाल्यानंतर गुरांना, शेळ्या-मेंढ्यांना व आदिवासी बांधवांना मार्च ते जूनपर्यंत या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत असतो, तसेच पाटांचे पाणी जमिनीत मुरल्याने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे धरणांचे पाणी पाइपलाइनद्वारे नेण्यास विरोध असून, ते पाटचारीद्वारेच न्यावे, अन्यथा शांततेचा भंग झाल्यास त्यास नगरपालिका जबाबदार राहील, असे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, सहायक अभियंता लघुपाटबंधारे विभाग नंदुरबार, तालुका पोलीस ठाणे, मुख्याधिकारी नगरपालिका, कार्यकारी अभियंता सिंचन भवन धुळे यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर सरपंच कमल ठाकरे, विजय शेवाळे, अशोक अर्जून पाटील, रामकृष्ण रामचंद्र पाटील, पाहुबा पाटील, देवेंद्र आघाव, नरोत्तम शेवाळे, लोटन शेवाळे, भाऊसाहेब गाठे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Farmers in Ashte oppose bringing water from Ambebara Dam through pipeline to Vihi in Ashte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.