पाऊस लांबल्यामुळे शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:21+5:302021-06-24T04:21:21+5:30
जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी ...

पाऊस लांबल्यामुळे शेतकरी हवालदिल
जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी लांबलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून, पावसाची कोणतीही चाहूल दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शहादा तालुक्यात जून महिन्यात ७ जूनला चांगल्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली होती. मात्र, त्यानंतर पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवडीचे संकट उद्भवले आहे, तर मोजक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.
शहादा तालुक्यात महत्त्वाचे व नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. जून महिना संपत आला तरी पावसाची कोणतीच चाहूल नसल्यामुळे कापसाची लागवड धोक्यात आली आहे. सोबत पेरण्याही लांबत आहेत. त्यामुळे पाऊस कधी येईल आणि पेरण्या होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. एकच पाऊस झाल्याने लागवड कमी झाली आहे, तसेच बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे.
तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी बागायती कापूस लागवड केली असली तरी पाऊस नसल्याने या कापसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. बागायती कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे विहिरी, तसेच कूपननलिकेतील पाणी भरावे लागत आहे. मात्र, जे शेतकरी पावसाच्या पाण्यावर कापूस लागवड, तसेच पेरणी करीत असतात असे शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत. तालुक्यात खरीप हंगामात कापसासोबत मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, अशी पिके घेतली जातात. मात्र, पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पेरणी करता आलेली नाही.
यावर्षी जून महिन्यात शहादा तालुक्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत. जून महिना संपत आला तरी पेरण्या होऊ न शकल्याने आता शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच खरिपाच्या पेरण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पेरण्यांना उशीर होणार असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट, तसेच गारपीट, चक्रीवादळाचा धोका, अवकाळी पाऊस आणि आता पाऊस लांबल्याने शेतकरी चहूबाजूंनी आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे.