शेतकऱ्याने सहा एकर क्षेत्रातील पपई कापली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST2021-07-01T04:21:50+5:302021-07-01T04:21:50+5:30
ब्राह्मणपुरी : कुठे पावसाचा अभाव, तर कुठे अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या कारणामुळे पपई उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. ...

शेतकऱ्याने सहा एकर क्षेत्रातील पपई कापली
ब्राह्मणपुरी : कुठे पावसाचा अभाव, तर कुठे अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या कारणामुळे पपई उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. असाच प्रकार रायखेड शिवारात दिसून आला असून, मोझाईक रोगामुळे शेतकऱ्याला चक्क सहा एकर क्षेत्रातील पपई कापावी लागली आहे.
याबाबत असे की, शहादा तालुक्यातील रायखेड येथील शेतकरी वासुदेव माधव पाटील यांनी रायखेड शिवारातील सर्व्हे नंबर २९ मधील सहा एकर क्षेत्रात १ एप्रिल रोजी साडेपाच हजार रोपांची लागवड केली होती. रोपांना जगविण्यासाठी रासायनिक खताबरोबर इतर खर्च केला होतां परंतु तीन महिन्यांनंतर या पपई पिकावर मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाला. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्याने विविध उपाययोजना केला; परंतु हा रोग हळूहळू वाढत गेल्याने पपईच्या झाडाच्या शेंड्याची वाढ कमी झाली. सुरुवातीला शेंड्यावरील नवीन पानांच्या शिरामध्ये पिवळी चित्रविचित्र रंगसंगती दिसायला लागली. त्याचबरोबर पानांच्या कडावर वळत गेले, नवीन पाने सपाट नसून, मुरडलेली व उठावदार पृष्ठभागाची दिसायला लागली. त्यांचा आकार बदलून पानाच्या पाळ्या अरुंद व्हायला सुरुवात झाली. बहुतेक पानावर शिराच दिसून आल्या, त्यामुळे वासुदेव पाटील यांनी आपल्या पपईच्या लागवड केलेल्या पिकावर मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच येणाऱ्या काळात फळ धारणाच होणार नसल्यामुळे वर्ष वाया न घालता चक्क आपल्या सहा एकर क्षेत्रात लागवड केलेली पपईची पिके कापून इतर पीक लागवड करण्याचा निर्णय घेतला. पपई पिकासाठी खतासह लागवड खर्च सुमारे अडीच लाख रुपये वाया गेले असून, शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
मी माझ्या सहा एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. यासाठी मला सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला होता; परंतु मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विविध उपाययोजना करूनदेखील रोग आटोक्यात येत नसल्याने येणाऱ्या काळात उत्पन्न मिळणार नसल्याचे स्पष्ट दिसून आल्याने हृदयावर दगड ठेवून पपई पीक कापावे लागले. - वासुदेव माधव पाटील, शेतकरी, रायखेड, ता.शहादा
जर प्रादुर्भाव हा पाच टक्क्यांच्या आत असेल तर प्रादुर्भावग्रस्त भाग हा काढून टाकावा आणि प्रादुर्भाव जर पाच टक्क्यांच्या वर असेल तर पाण्याचा जास्त ताण देऊ नये, तसेच सकिंग पेस्टच्या नियंत्रणाकरिता इमिडा क्लोप्रिड, अँसिफ्रेडच्या फवारणीसोबत मायक्रो न्यूट्रेंड किंवा १९.१९.१९,१३०४५,०५२३४ चा विद्राव्य खतांचा फवारणीमध्ये समावेश करावा, तसेच शेतकऱ्यांनी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आल्यावर कृषी विभागाशी संपर्क साधावा. - किशोर हडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा.