५६ मंडळांकडून बाप्पांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:33 IST2020-09-02T13:32:40+5:302020-09-02T13:33:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा बाप्पांचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला असला तरी निरोप देण्यासाठी भक्तांना हुरहूर लागली ...

५६ मंडळांकडून बाप्पांना निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा बाप्पांचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला असला तरी निरोप देण्यासाठी भक्तांना हुरहूर लागली आहे. अनंत चतुदर्शीला नंदुरबार शहरात २६ सार्वजनिक मंडळे व चार खाजगी मंडळे यांच्यासह शेकडो घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात ५६ सार्वजनिक व पाच खाजगी मंडळांचा समावेश आहे. कुणालाही सार्वजनिक स्वरूपात मिरवणूक काढण्यास परवाणगी नाही. त्यामुळे यंदा दादा व बाबा गणपतींची हरिहर भेट होणार नाही.
दरम्यान, पालिकेने तीन ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहे. भविकांनी त्याच ठिकाणी मूर्ती विसर्जन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नंदुरबारात अनंत चतुदर्शीच्या दिवशी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांची दरवर्षी धूम असते. तब्बल २६ मंडळे मिरवणुका काढत, त्यामुळे सर्वत्र चैतन्य आणि जल्लोषाचे वातावरण राहत होते. यंदा मात्र कोरोनामुळे बाप्पांचा उत्सव साधेपणाने साजरा झाला. आता बाप्पांना निरोपही साधेपणानेच दिला जाणार आहे. सर्वच मोठी मंडळे, मानाचे गणपती यांचे परस्पर विसर्जन केले जाणार असल्याने प्रशासनावरील ताण देखील कमी झाला आहे.
तीन ठिकाणी कृत्रीम तलाव
नंदुरबार पालिकेतर्फे तीन ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आले आहेत. आधी चार तलावांचे नियोजन होते. त्यापैकी एक तलाव रद्द करण्यात आला आहे. आता तीन तलाव कार्यान्वीत राहणार आहेत. त्यात साक्रीनाका परिसरातील दसेर मैदानालगतचा तलाव, नळवा रस्त्यावरील वैशाली नगर भागातील तलाव आणि निझर रोडवर सी.बी.पेट्रोलपंपच्या मागील जागेवर अशा तीन ठिकाणी हे तलाव राहणार आहेत.
दसेरा मैदानाजवळील तलावाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी आलेल्या अडचणी व समस्या लक्षात घेत हा बदल करण्यात आला आहे. भाविकांना आता चांगली सुविधा या ठिकाणी होणार आहे.
तिन्ही तलावाच्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी तैणात करण्यात येणार आहेत. भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेऊनच विसर्जनस्थळी जमावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
पालिकेतर्फे मोठा मारुती मंदीराजवळ विसर्जनासाठीच्या मूर्ती स्विकारण्याची सोय करण्यात आली आहे. बंदीस्त वाहनांद्वारे मूर्ती प्रकाशा येथे तापी पात्रात विसर्जीत करण्यात येणार आहे.
वाढीव बंदोबस्त
शहरात सर्वच भागात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी आणि होमगार्डही पोलिसांच्या मदतीला राहणार आहे. कुणीही मिरवणूूक काढणार नाही यासाठी पोलिसांची नजर राहणार आहे.
नंदुरबारातील २६ मोठी मंडळांतर्फे अनंत चतुदर्शीला गणेश मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी या मंडळांनी तयारी केली आहे. दरवर्षी या मंडळांतर्फे भव्यदिव्य मिरवणुका काढल्या जात. त्यासाठीची तयारी महिनाभर आधीपासून केली जात होती. यंदा मात्र परस्पर गणेश मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. या मंडळांमध्ये मानाचे दादा व बाबा गणपती मंडळासह मंडळांमध्ये रोकडेश्वर हनुमान, भोई समाज मंडळ, वीरशैव लिंगायम मंडळ, पवनपूत्र मंडळ, राणा राजपूत समाज मंडळ, सिद्धी विनायक मंडळ, सावता फुले मंडळ, स्वामी विवेकानंद, मारुती व्यायाम शाळा, जोशी-गोंधळी समाज, जय दत्त व्यायाम शाळा, नवयुवक, वीर छत्रपती शिवाजी, भगवा मारुती, विजयानंद, महाराणा प्रताप, संताजी जगनाडे, सागर यासह इतर मंडळांचा समावेश आहे.
नंदुरबारातील गणेश विसर्जन मिरवणुकींमधील महत्वाचे आकर्षण असलेली मानाच्य गणपतींची हरिहर भेट यंदा रद्द करण्यात आली आहे. दादा व बाबा गणपती मंडळांतर्फे परस्पर मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पाच ते दहा कार्यकर्ते मूर्ती विसर्जनासाठी जाणार आहेत. रथावर देखील मूर्ती नेली जाणार नाही. रथ ओढण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ असते. त्यामुळे रथ न नेता दुसऱ्या वाहनावर मूर्ती ठेऊन विसर्जनासाठी नेली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा यंदा खंडित होणार आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा निर्णय वेदनादायी असला तरी कोरोनामुळे नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोनी विहिरीत फक्त मानाचे अर्थात दादा, बाबा गणपतींचे विसर्जन केले जाते. उर्वरित सर्व गणपतींचे प्रकाशा येथे तापी नदीत विसर्जन केले जाते. त्यासाठी पालिकेतर्फे मूर्ती वाहून नेण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था असते. मिरवणुकीने सर्व मंडळे सोनी विहिर अर्थात मोठा मारुती मंदीरापर्यंत येतात. तेथे पालिकेच्या वाहनात मूर्ती ठेवून मिरवणूक विसर्जीत करतात. पूर्वी सर्वच गणेश मूर्र्तींचे सोनी विहिरीत गणेश विसर्जन केले जात होते. मात्र, विहिरीला पाणी राहत नसल्यामुळे पाच वर्षांपासून हा निर्णय झाला आहे.
४याशिवाय ३० पेक्षा अधीक सीसीटीव्ही कॅमेरे देखील शहरात आहेत. त्यांच्या मार्फत देखील पोलिसांची नजर राहणार आहे.
४ड्राय डे असल्यामुळे कुठेही अवैद्य मद्य विक्री होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना देखील सक्त सुचना दिलेल्या आहेत. थेट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.