अखेर ‘त्या’ महिला डाॅक्टरची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:07+5:302021-08-01T04:28:07+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये चालवण्यात येणारे मोबाइल मेडिकल युनिट गैरव्यवहारामुुळे चर्चेत आलेल्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. ...

अखेर ‘त्या’ महिला डाॅक्टरची बदली
नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये चालवण्यात येणारे मोबाइल मेडिकल युनिट गैरव्यवहारामुुळे चर्चेत आलेल्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा शिंदे यांची अखेर आरोग्य विभागाने शहादा तालुक्यात बदली केली आहे; परंतु यानंतरही आरोग्य विभाग डाॅ. शिंदे यांच्यावर कारवाई सुरू ठेवणार आहे.
बोरद मोबाइल मेडिकल युनिटमध्ये औषध खरेदी, वाहन दुरुस्ती, इंधन पुरवठा व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर डल्ला आदी गैरव्यवहार केल्याप्रकरणी चाैकशी सुरू असलेल्या डाॅ. रेखा शिंदे यांचा पदभार काढून घेण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते; परंतु कागदोपत्री कारवाईमुळे त्यांचा तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा चार्ज काढून घेत पुन्हा बोरद आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यातून गैरव्यवहाराची चाैकशी लांबली होती. दरम्यान, हे प्रकरण ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर आरोग्य विभागाने डाॅ. शिंदे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय समितीचा अद्याप निर्णय आलेला नसल्याने त्यांना कामकाज सुरू ठेवण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून मुंबई येथे आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बदली समुपदेश शिबिर सुरू आहे. यात डाॅ. शिंदे यांची बदली कलसाडी, ता. शहादा येथे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
‘लोकमत’ने मोबाइल मेडिकल युनिट गैरव्यवहारात सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बदलीनंतरही पुढील गैरव्यवहारप्रकरणी चाैकशी सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक येथील आरोग्य उपसंचालक यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, येत्या आठवड्यात योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बोरद रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षांनीही डाॅ. शिंदे यांच्या कामकाजाबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. बाेरद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या संगीता पवार ह्या रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा आहे; परंतु त्यांची सदस्यपदी निवड झाल्याच्या सहा महिन्यांनंतर त्यांना या पदावर घेण्यात आले. वर्षे होऊनही त्यांना रुग्ण कल्याण समितीच्या कामकाजाची किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यात आलेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.