अजूनही जोरात पाऊस आला तरी नवीदिल्लीपाड्याकडे निघून जातो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:10 IST2020-07-12T12:09:57+5:302020-07-12T12:10:04+5:30
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धो-धो कोसळणारा पाऊस, मधूनच ऐकू येणारा रेल्वेचा भोंगा अन् अचानक झालेला ...

अजूनही जोरात पाऊस आला तरी नवीदिल्लीपाड्याकडे निघून जातो
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धो-धो कोसळणारा पाऊस, मधूनच ऐकू येणारा रेल्वेचा भोंगा अन् अचानक झालेला मोठा आवाज अशा काळरात्रीला कोण विसरेल, आजही ती रात्र आठवली की अंगावर शहारे येत असल्याचा अनुभव धरमसिंग प्रधान सांगत होते़ पाचोराबारी ता़ नंदुरबार येथे ११ जुलै २०१६ च्या घटनेला त्यांनी उजाळा देत त्यानंतरही ग्रामस्थांमध्ये घटनेची पुनरावृत्ती होईल अशी भिती असल्याची माहिती दिली़
तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर येथील ग्रामस्थ नजीकच असलेल्या ‘नवी दिल्लीपाड्यात’ निघून जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली़
११ जुलै २०१६ च्या मध्यरात्री पाचोराबारी गावातील रेल्वे पट्ट्याच्या पलीकडे असलेल्या उखड्या नाला परिसरातील आदिवासी व बंजारा समाजाची वसाहती निपचित पडली असताना अचानक मध्यरात्री ढगफूटी होवून हाहाकार उडाला होता़ पाण्याची पातळी ही आठ ते दहा फूटांपेक्षा वर गेल्याने काही क्षणात घरे पाण्याखाली गेली होती़ यातून २०० पेक्षा अधिक पाळीव जनावरे वाहून गेली़ घरादाराचे होत्याचे नव्हते झाले अन् काळजाच्या जवळ असलेली सहा माणसे पाण्यात वाहून गेली़ संपूर्ण रात्र सुरू असलेल्या हाहाकारानंतर सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पाचोराबारीत मदतीसाठी शेकडो हात पुढे आले होते़
चार वर्षानंतर शासन, प्रशासन आणि सेवाभावी संस्था यांच्या मदतीतून हे गाव पुन्हा उभे राहिले असून चार वर्षांपूर्वीच्या त्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करत आहेत़ शनिवारी याठिकाणी भेट दिली असता, गावातील बहुतांश नागरिक हे शेतावर कामांसाठी गेल्याची माहिती देण्यात आली़
लोकसहभागातून बांधलेली घरे, सेवाभावी संस्थांनी दिलेले बाक, गावातील प्रत्येक रस्त्याचे झालेले काँक्रिटीकरण काही अंशी सुधारणा झाल्याचे सांगत होते़ तर दुसरीकडे रेल्वेने नवीन रेल्वे बोगदा तयार करण्याचे कामही पूर्णत्त्वास नेल्याचे दिसून आले़ एकूणएक गाव पुन्हा उभे राहिले असले तरी काळ रात्रीच्या स्मृती मात्र कायम आहेत़
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सेवाभावामुळे पाचोराबारी अवघ्या काही दिवसात पूर्वपदावर आले होते़ मयतांच्या वारसांसह गुरे, घरे आणि संसारोपयोगी साधनांची भरपाई त्यांनी मिळवून देत बाधितांना उभे केले़ वेळोवेळी या गावाला त्यांनी भेट देत माय-माऊल्यांची आस्थेने विचारपूस केली़ त्यांच्या या आस्थेवाईकपणाचे फळ म्हणून पाण्याखाली गेलेल्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीचे कलशेट्टी नगर असे नामकरण करुन त्यांना सन्मान दिला गेला़