लॉकडाऊनमध्येही जाम से जाम टकराये..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:14 IST2020-09-08T12:14:08+5:302020-09-08T12:14:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात अर्थात २२ मार्च ते एप्रिल अखेर मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली ...

Even in lockdown, jam to jam ..! | लॉकडाऊनमध्येही जाम से जाम टकराये..!

लॉकडाऊनमध्येही जाम से जाम टकराये..!


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात अर्थात २२ मार्च ते एप्रिल अखेर मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तो सव्वा महिन्याचा लॉकडाऊनचा कालावधी वगळता मे ते आॅगस्ट दरम्यान मद्यपींनी तब्बल २८ लाख ५२ हजार लिटर मद्य रिचवले आहे. वास्तविक या काळात बार, हॉटेल्स बंद असतांना आणि मद्य विक्रीच्या दुकानांची वेळ देखील रात्री सात वाजेपर्यंतची असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य रिचवले गेले आहे. यत बिअर आणि देशी मद्याचा सर्वाधिक समावेश आहे.
लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीचे सव्वा महिने मद्य विक्री बंद होती. परंतु राज्याचा मोठा महसूल बुडत असल्याच्या कारणावरून मद्य विक्रीला परवाणगी देण्यात आली. अर्थात मे महिन्यापासून मद्य विक्री सुरू करण्यात आली. तेव्हापासून आॅगस्ट अखेर मदिराप्रेमींनी तब्बल २८ लाख ५२ हजार ६०६ लिटर मद्य रिचविले आहे. या माध्यमातून उत्पादन शुल्क विभागाला मोठ्या प्रमाणावर कर देखील मिळाला आहे.
सव्वा महिन्याचा हिशोब
२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता. त्यावेळी मद्य विक्रीची दुकाने, बिअरबार यांच्यात जेवढा साठा होता तेव्हढ्या साठ्याची उत्पादन शुल्क विभागाने पडताळणी करून सील केले होते. विक्रीला परवाणगी मिळाल्यानंतर तो साठा पडताळून पाहिला जाणार होता. त्यानुसार सव्वा महिन्याच्या कालावधीत अनेक जणांनी विक्रीचा प्रयत्न केला. त्यांच्यावर विभागाने धाड टाकून कारवाई केली. शहादा, नंदुरबार व नवापूर येथील काही दुकाने सील देखील करण्यात आली होती. त्यांचे लायसन्स देखील काही कालावधीसाठी रद्द करण्यात आले होते. परंतु तरीही मदिराप्रेमींना या कालावधीत सहज मद्य उपलब्ध होत होते. काहींना घरपोच सेवा उपलब्ध होत होती. त्यामुळे हे मद्य येते कुठून हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
बनावट मद्याचा महापूर
लॉकडाऊनच्या पहिल्या सव्वा ते दीड महिन्यात बोगस व बनावट मद्याची मोठ्या प्रमाणावर रेलचेल होती. विक्रीला परवाणगी नसल्याने बनावट आणि गावठी खपविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला. त्यातून अनेक मद्य सम्राटांनी आपले इप्सीत साध्य करून घेतले होते. अशांवर देखील उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या.
बिअर सर्वाधिक रिचवली
मे ते आॅगस्ट या १२० ते १२२ दिवसात जिल्ह्यातील बिअरप्रेमींनी तब्बल १० लाख ५३ हजार १६४ लिटर बिअर घोटली.
जून महिन्यात सर्वाधिक अर्थात तीन लाख ४४ हजार ४६१ लिटर तर आॅगस्ट महिन्यात सर्वात कमी अर्थात दोन लाख दोन हजार ७०६ लिटरचा समावेश आहे. मे महिन्यात दोन लाख ७९ हजार ३१७ लिटर तर जुलै महिन्यात दोन लाख २६ हजार ६८० लिटर बिअर रिचवली गेली.
देशी प्रेमी...
देशी दारूचे प्रेमीही जिल्ह्यात कमी नसल्याचे चित्र आहे. चार महिन्यात तब्बल ११ लाख ४६ हजार ८३७ लिटर देशी दारूची विक्री झाली. सर्वाधिक जून महिन्यात तीन लाख ३३ हजार ३६१ लिटर तर सर्वात कमी आॅगस्ट महिन्यात दोन लाख ३५ हजार ४७१ लिटरचा समावेश होता. मे महिन्यात तीन लाख १२ हजार ९८८ लिटर तर जुलै महिन्यात दोन लाख ६५ हजार १७ लिटर देशी दारूचा समावेश आहे.
विदेशी चौथ्या स्थानावर
विदेशी मद्य देखील मोठ्या प्रमाणावर रिचविले गेले. चार महिन्यात सहा लाख ३० हजार ९५६ लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. त्यात सर्वाधिक विक्री जून महिन्यात एक लाख ९३ हजार ६२ लिटर तर सर्वात कमी आॅगस्ट महिन्यात एक लाख २१ हजार ७०८ लिटरचा समावेश आहे. मे महिन्यात एक लाख ८७ हजार ३८ तर जुलै महिन्यात दोन लाख २६ हजार ६८० लिटरचा समावेश आहे.
वाईनचेही शौकिन...
मद्यपींमध्ये वाईनचे देखील मोठ्या प्रमाणावर शौकीन असल्याचे दिसून येते. चार महिन्यात २१ हजार ६४९ लिटर वाईन पोटात गेली. आॅगस्ट महिन्यात वाईन आठ हजार ३६ लिटर तर सर्वात कमी मे महिन्यात एक हजार ४७७ लिटरचा समावेश आहे. जुलै महिन्यात सात हजार ४१६ लिटर व जून महिन्यात चार हजार ७२० लिटर वाईनचा समावेश आहे.
आॅगस्ट महिन्यात श्रावण मास आणि गणेशोत्सव आल्यामुळे या काळात अनेकांनी मद्याला न शिवण्याचे ठरविले असल्याचे दिसते. कारण चार महिन्याच्या तुलनेत आॅगस्टमध्ये देशी, विदेशी आणि बिअरची विक्री कमी झाल्याचे चित्र आहे.
आॅगस्टमध्ये देशी मद्य दोन लाख ३५ हजार ४७१, विदेशी मद्य एक लाख २१ हजार ७०८ तर बिअर दोन लाख दोन हजार ७०६ लिटर मद्य रिचवले गेले.
वाईन मात्र चार महिन्याच्या कालावधीच्या तुलनेत आॅगस्ट मध्ये सर्वाधिक रिचवली गेल्याचे दिसून येते. आठ हजार ३६ लिटर वाईन विक्री झाल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमध्ये मद्य विक्रीवर बंदी होती. सर्व मद्य विक्रीची दुकाने बंद होती. त्यामुळे या महिन्यात एकही लिटर दारू विक्री केली गेली नसल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवर नोंद आहे.
 

Web Title: Even in lockdown, jam to jam ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.