विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे गारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 01:13 PM2020-09-18T13:13:14+5:302020-09-18T13:13:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : २१ व्या शतकात माणूस विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्रावर घर बांधण्याचे स्वप्न पाहत असला तरी आजच्या ...

Even in the age of science and technology, superstition is rampant | विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे गारुड

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे गारुड

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : २१ व्या शतकात माणूस विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्रावर घर बांधण्याचे स्वप्न पाहत असला तरी आजच्या युगातही समाजावर मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा प्रभाव आहे. त्याचाच प्रत्यय सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने ठिकठिकाणी दिसून आला.
सर्वपित्री अमावस्या म्हणजे मेलेल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांना नैवेद्य खाऊ घालण्याचा दिवस. पण या अमावस्येविषयी समाजमनात मोठ्या प्रमाणात भीती असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे ही अमावस्या म्हणजे मांत्रिक-तांत्रिकांसाठी लोकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन तथाकथित अघोरी कृत्य किंवा करणी करण्यासाठी एक मोठी पर्वणी असते. याच अमावस्येचा योग साधून काही जण विविध पूजाअर्चा करून पूर्वजांना प्रसन्न करून काही तरी लाभ प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात.
असेच काहीसे प्रयत्न मांत्रिक-तांत्रिकांनी केलेले या सर्वपित्री अमावस्येलाही झाल्याचे चित्र तळोदासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिसून आले. अनेक जणांनी सर्वपित्री अमावस्येचा मुहूर्त साधत पूजाअर्चा करून पूजेचे सामान ठिक-ठिकाणच्या चौफुली व रस्त्याच्या कडेला टाकलेले दिसून आले. हा प्रकार रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरला. अनेक जणांना भीतीपोटी त्या वस्तूंना स्पर्श होणार नाही, त्या वस्तू ओलांडल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली तर काहींनी अशा बाबी अनवधानानेही घडू नये म्हणून घरातून बाहेर पडणे टाळले.
नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा जिल्ह्यात अंधश्रद्धांचे प्रस्थ मोठे आहे. डाकिणीच्या निमित्ताने वारंवार अशा अंधश्रद्धांचा प्रत्यय दिसून येतो. याशिवाय दैवी शक्तीच्या बहाणाने मंत्रोपचार करणे, पैशांचा पाऊस पाडणे, मंत्राने सापाचे विष काढणे, मांडूळची खरेदी-विक्री अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या बाबी जिल्ह्यात घडल्या आहेत. पारंपरिक श्रद्धांचा प्रभाव व शिक्षणाचा अभाव ही अंधश्रद्धेची कारणे असून अनेक जण या अंधश्रद्धांना वेळोवेळी बळी पडले आहेत. याविरोधात प्रबोधनाची मोहीम उघडण्याची गरज असून याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध संस्था, संघटना व लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज आहे.
कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज
समाजात घडणाºया अंधश्रद्धांच्या घटना व त्यातून समाजाचे होणारे शोषण रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे शासनाने २०१४ साली जादूटोणाविरोधी कायदा केला. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप जिल्ह्यात झालेली नसल्याचे दिसून येते. गेल्या काही काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी डाकिणीच्या संदर्भात घडलेल्या विविध प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे या कायद्याअंतर्गत आठ ते दहा गुन्हे दाखल करण्यात आले. या कायद्याअंतर्गत दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक अनेक वर्षे झाली नसल्याचे समोर आले होते. अंधश्रद्धांच्या प्रकरणांचा आढावा घेऊन अधिकाºयांनी स्वत: गुन्हे दाखल करण्याची तरतूद या कायद्यात आहे. जिल्ह्यात घडणाºया अंधश्रद्धांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या कायद्याचे प्रशिक्षण व प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.
परंपरगत झालेली मनाची जडणघडणीमुळे अनेक बाबींसंदर्भात लोकांच्या मनात भीती दिसून येते. त्याचाच फायदा समाजातील काही तथाकथित मांत्रिक-तांत्रिक घेऊन अशा विशिष्ट दिवसांचे औचित्य साधून लोकांच्या समस्या निराकरणासाठी व लाभासाठी अघोरी पूजाविधीचा घाट घालतात. त्यातून घडणाºया अनेक बाबींमुळे समाजात दहशत निर्माण होते आणि लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावातून निर्माण होणारी ही दहशत संपविण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करीत असते. अशा अनिष्ट बाबींविरोधात अंनिसकडून प्रबोधन करण्यात येईल.
-किर्तीवर्धन तायडे,
जिल्हा प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस, नंदुरबार.
 

Web Title: Even in the age of science and technology, superstition is rampant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.