शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:09+5:302021-03-04T04:59:09+5:30
प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी हे जिल्हास्तरीय समितीचे सचिव असून, त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा, तालुका, केंद्र, वाॅर्ड, गाव, अशा विविध ...

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना
प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी हे जिल्हास्तरीय समितीचे सचिव असून, त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा, तालुका, केंद्र, वाॅर्ड, गाव, अशा विविध स्तरांवर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस हे गृहभेटी घेत सर्वेक्षण करत आहेत.
१० मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत यामधील जन्म-मृत्यू नोंदींचा वापर करण्यात येणार आहे. कुटुंब सर्वेक्षण करताना तात्पुरते स्थलांतर करणारी कुटुंबे व मूूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतरितांची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी पर्यवेक्षक म्हणून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.
मोहिमेंतर्गत प्रगणक म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच नोडल अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुका बालविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी यांच्याकडून माहिती घेतली असता, समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड व सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे हे दर दिवशी आढावा घेत आहेत. शिक्षण विभागासह इतर विभागांचे कर्मचारी साहाय्य करत असून, १० मार्चपर्यंत सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, असे सांगितले.