१५० बेडचे सुसज्ज कोविड कक्ष लवकरच सिव्हीलला कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:38 IST2020-07-30T12:38:03+5:302020-07-30T12:38:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १५० बेडचे सुसज्ज कोविड कक्ष, ८९ लाख रुपये खर्च करून आणि दैनंदिन १२०० पेक्षा ...

Equipped covid room with 150 beds will soon be operational | १५० बेडचे सुसज्ज कोविड कक्ष लवकरच सिव्हीलला कार्यान्वीत

१५० बेडचे सुसज्ज कोविड कक्ष लवकरच सिव्हीलला कार्यान्वीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : १५० बेडचे सुसज्ज कोविड कक्ष, ८९ लाख रुपये खर्च करून आणि दैनंदिन १२०० पेक्षा अधीक स्वॅब तपासणी क्षमता असलेली प्रयोगशाळा व नंदुरबारात दोन फिरते स्वॅब संकलन केंद्र येत्या काळात सुरू होत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणता येईल आणि रुग्णांना वेळीच उपचार मिळेल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या, वाढते मृत्यू व प्रशासनाच्या उपाययोजना या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे. याबाबत त्यांनी सांगितले, रुग्ण अगदी शेवटच्या क्षणाला रुग्णालयात दाखल होतात. याशिवाय ८० टक्के रुग्ण हे वयोवृद्ध होते.
मृत्यूपूर्वी ४८ तास अगोदर दाखल केलेल्या २० रुग्णांचा मृत्यू असाच झालेला आहे, त्यामुळे लक्षणे दिसताच स्वॅब देण्यासाठी येऊन उपचार सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले.
४३० बेडची सुविधा...
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अर्थात महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीत १५० बेडचे नवीन कोविड कक्ष सुरू करण्यात येत आहे. यातील सर्व बेड हे आॅक्सीजनची सुविधा असणारे राहणार आहेत.
याशिवाय व्हेंटीलेटरची देखील सुविधा राहणार आहे. शहाद्यात ६० बेडचे कोविड कक्ष सुरू करण्यात आले आहे. ते २०० बेडचे करणार आहे. याशिवाय तळोदा येथेही १०० बेडचे कोविड कक्ष सुरू करण्यात येणार आहे. नंदुरबार, शहादा व तळोदा येथे मिळून एकुण ४३० बेडची सोय कोविड रुग्णावर उपचारासाठी राहणार आहे.
खाजगी रुग्णालये तयार
जिल्ह्यात असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता खाजगी रुग्णालयांनाही आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येकी २० बेडचे दोन हॉस्पीटल नंदुरबारात सुरू करण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना शासकीय दरानुसार उपचार करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. यामुळे उपचाराची आणखी सोय होणार आहे.
इंजेक्शन उपलब्ध
जिल्हा रुग्णालयात कोरोनावरील इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात १० टोसीलीझुमॅब, ४० रेमडीसीव्हर व ३० फलॅवीपीरॅवीर इंजेक्शनचा समावेश आहे. त्यातील काही इंजेक्शनचा वापर रुग्णांवर करण्यात आला आहे.
खाजगी डॉक्टरांची सेवा
सध्या खाजगी डॉक्टर जिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. डॉ.राजकुमार पाटील यांच्यासारखे सिनिअर डॉक्टर कोविड कक्षात उपचार घेणाºया रुग्णांच्या तपासणीसाठी राऊंडला येत आहेत. खाजगी डॉक्टरांनी आपल्या सेवा आपल्या दवाखान्यात नियमित सुरू ठेवाव्यात. सर्वच आजारावरील रुग्णांची तपासणी व उपचार करावे. जेणेकरून जिल्हा रुग्णालयावर ताण येणार नाही. मेस्मा लागू करण्याइतकी परिस्थिती जिल्ह्यात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वॅब संकलन वाढविणार
स्वॅब संकलनासाठी विविध पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. लवकरच तालुका पातळीवर स्वॅब संकलन केले जाणार आहे. सद्य स्थितीत नंदुरबार आणि शहादा येथे सुरू आहे. नंदुरबारसाठी लवकरच दोन फिरते स्वॅब संकलन केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार आहे. खाजगी रुग्णालयांनी उपचार कक्ष सुरू केल्यास त्यांना मोफत स्वॅब संकलन व तपासणी करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी स्पष्ट केले.

नंदुरबारात लवकरच अत्याधुनिक स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे. ८९ लाख रुपये खर्चाची ही प्रयोगशाळा आहे. त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. याशिवाय ६० लाख रुपये किंमतीच्या टेस्ट किट देखील आॅर्डर करण्यात आल्या आहेत. एका दिवसात १२०० पेक्षा अधीक स्वॅब तपासणी करण्याची क्षमता या प्रयोगशाळेत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाचे निदान लागलीच होण्यास मदत होऊन उपचारही लागलीच मिळू शकणार आहे. स्वॅब संकलन व तपासणी वाढविण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Equipped covid room with 150 beds will soon be operational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.