महामारीत मुन्नाभाई एमबीबीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:40+5:302021-06-27T04:20:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बोगस डाॅक्टरांवर कारवाईचे सत्र गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे ...

महामारीत मुन्नाभाई एमबीबीएस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बोगस डाॅक्टरांवर कारवाईचे सत्र गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी असे डाॅक्टर्स सक्रिय आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत बोगस डाॅक्टरांवर जिल्ह्यात कारवाईच झालेली नाही. शिवाय स्थानिक स्तरावरूनदेखील त्याबाबत कुणी तक्रारी केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर पूर्वी बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट राहत होता. परंतु आता आरोग्य सेवा सर्वदूर पोहोचल्याने अशा डाॅक्टरांची दुकानदारी काही प्रमाणात बंद झाली आहे. परंतु अनेक महाभाग अजूनही सक्रिय आहेत. लोकांचीही त्यांच्यावर भावना बसली आहे. शिवाय वेळेवर आणि कमी पैशात उपचार मिळत असल्याने जीवाची पर्वा न करता अशा डॅाक्टरांकडे अनेक जण उपचार करून घेत असतात.
शासकीय आरोग्य केंद्रातील उपचार...
दुर्गम भागात शासकीय आरोग्य केंद्रात डाॅक्टरच उपस्थित राहत नसल्यामुळे ऐनवेळी तेथील परिचारिकांनाच उपचार करावा लागतो. अत्यावश्यक रुग्ण आल्यास त्यावर तात्पुरता उपचार करून ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते. साध्या आजारावर मात्र परिचारिकाच औषधी देऊन वेळ निभावून नेत असल्याचेही प्रकार दुर्गम भागात अनेक आरोग्य केंद्रांत दिसून येतात.
तक्रार आली तरच कारवाई
शहरासह ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. कारवाई किंवा माहिती देण्याचे अधिकार स्थानिक सरंपच किंवा ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच नागरिकांनादेखील आहेत. मात्र कारवाईबाबत कोणीही माहिती देत नाही. तसेच तक्रार केल्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाते.