दीपपर्वाच्या चैतन्यात राजकारणातही उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 12:32 PM2020-11-15T12:32:28+5:302020-11-15T12:32:45+5:30

राजरंग रमाकांत पाटील नंदुरबार : कोरोना महामारीने गेल्या आठ महिन्यांपासून सर्वांनाच ‘लॉकडाऊन’ केले होते. पण दीपपर्वावर मात्र गेल्या आठ महिन्यांपासून ...

Enthusiasm in politics in the spirit of Deepaparva | दीपपर्वाच्या चैतन्यात राजकारणातही उत्साह

दीपपर्वाच्या चैतन्यात राजकारणातही उत्साह

Next

राजरंग

रमाकांत पाटील

नंदुरबार : कोरोना महामारीने गेल्या आठ महिन्यांपासून सर्वांनाच ‘लॉकडाऊन’ केले होते. पण दीपपर्वावर मात्र गेल्या आठ महिन्यांपासून अंधारलेले वातावरण प्रकाशमान होत आहे. सर्वच क्षेत्रात ही स्थिती आहे. राजकारणातही सर्वच पक्षात आत्मविश्वास बळावत असून या क्षेत्रातही कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण काहीसे अस्थिर होते. कार्यकर्ते व नेत्यांचे पक्षांतरामुळे सर्वच पक्षांना आपल्या राजकारणाचा अंदाज बांधणेही तेवढेच अवघड झाले होते. त्यातच कोरोनाने गेल्या आठ महिन्यांपासून सर्वांनाच घरात बंद केले होते. पण दिवाळीचे मुहूर्त  मात्र सर्वांनाच चैतन्यदायी ठरत आहे. काँग्रेस पक्षातून आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या चंद्रकांत रघुवंशी यांना दिवाळीच्या मुहूर्तावरच पक्षाने विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे रघुवंशी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणे साहजिकच आहे. नुकताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन नंदुरबार शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधताना रघुवंशी यांचे कौतुक केले. ते म्हणाले, रघुवंशी यांनी निवडणुकीपूर्वी सत्ता येईलच याची शाश्वती नसताना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे योगायोगाने आता सत्ता आली असल्याने त्यांना पक्षात योग्य न्याय मिळेल. स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे लोकार्पणाचे निमित्त साधत ते म्हणाले, रघुवंशी यांनी पोहता येईल की नाही याचा अंदाज न करता जलतरण तलावात उडी घेतली आहे. पण शिवसेना असा पक्ष आहे त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊ देणार नाही तर त्यांना पाणी पाजून संजीवनी देईल. एकूणच मुख्यमंत्र्यांनी रघुवंशींना बळ देण्याचे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. रघुवंशी हेदेखील आता शिवसेनेच्या संघटना बांधणीसाठी लागल्याने आणि जिल्ह्यात भगवा आणण्याचा संकल्प केल्याने यापूर्वी काहीशी मरगळ आलेल्या जिल्ह्यातील शिवसेनेतही चैतन्य आले आहे.
काँग्रेसदेखील केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधासाठी आंदोलनातून अधिक आक्रमक होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व कोण करेल? असा प्रश्न होता. पण ज्येष्ठ नेते व आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी आता काँग्रेसची सूत्रे अधिक मजबुतीने स्वीकारली असून तेदेखील पक्ष संघटनासाठी आक्रमक होऊ पाहत आहेत. एरवीच्या दोन-तीन कार्यक्रमात  काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हरवल्याचे चित्र होते. पण दिवाळीपूर्वीच केलेले ट्रॅक्टर आंदोलनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास पुन्हा परत येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून केलेले भव्य आंदोलन इतर पक्षांच्याही भुवया उंचावणारे ठरले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची अवस्थादेखील वाईट झाली होती. अनेक महिने जिल्हाध्यक्ष नव्हता. पण जिल्हाध्यक्ष निवडीनंतर हा पक्षही पुन्हा पुनर्बांधणीच्या वाटेवर रुळला आहे. माजी आमदार उदेसिंग पाडवी व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारू लागला आहे. दिवाळीनंतर लागलीच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दौरा जिल्ह्यात होणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गावोगावी छोटे मेळावे सुरू झाले आहेत. ऐन दिवाळीत या पक्षातही चैतन्य आले आहे.
भाजपमध्ये देखील सातत्याने कार्यक्रम व उपक्रमांमुळे उत्साहाचे वातावरण आहे. नुकतीच पक्षाची बैठक झाली असून त्यात नवीन कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. भाजपचे दोन आमदार व खासदार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व कार्यकारिणीही सक्रीय झाली आहे. सध्या विविध आघाड्यांच्या नियुक्त्याही सुरू असून संघटन बांधणीच्या पातळीवर  भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे या पक्षातील कार्यकर्तेही उत्साही झाले आहेत. एकूणच सर्वच पक्ष सध्या मोठ्या प्रमाणावर घडामोडी व हालचाली सुरू असल्याने राजकारणातही चैतन्याचे वातावरण आहे.

Web Title: Enthusiasm in politics in the spirit of Deepaparva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.