नवापुरात वीज बिल वसुली करण्यास गेलेल्या अभियंत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:37+5:302021-03-19T04:29:37+5:30
येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी आपल्या पथकासह शहरातील मंगलदास पार्कमध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. ...

नवापुरात वीज बिल वसुली करण्यास गेलेल्या अभियंत्याला मारहाण
येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी आपल्या पथकासह शहरातील मंगलदास पार्कमध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. थकीत वीज बिल वसुली न झाल्याने ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वीज वितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांच्यासह वरिष्ठ तंत्रज्ञ शिलेश बोटा गावित, आऊट सोर्स तंत्रज्ञ विश्वास झिंट्या गावित, रतिलाल गामजी गावित, अनिल शांतू गावित हे शहरातील मंगलदास पार्कमधील साईबाबा मंदिराजवळ वीज ग्राहक महेंद्र यशवंतराव पाटील यांच्याकडे जुलै २०२० पासून आजपावेतोचे ३१ हजार ९५० एवढे थकीत वीज बिल असल्याने त्यांच्या घरी गेले असता, त्यांचा मुलगा घरी भेटला. त्यांना समजावून सांगितले की, तुमच्या बिलाची रक्कम थकीत आहे. वीज बिल तत्काळ भरणा करा, अन्यथा तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असे बोललो असता त्यांनी सांगितले की, आमच्या घरात पेशंट आहेत, तुम्ही कसे काय विद्युत पुरवठा खंडित करता ते पाहतो, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही शासकीय काम करीत आहोत, आम्हाला सहकार्य करा, असे बोलत असताना तेव्हा तेथे त्यांचा मोठा भाऊ भेटेसिंग महेंद्र पाटील याने शिवीगाळ करून माझ्या जवळ अंगावर धावत येत दहशत निर्माण करून आमच्या घरात सिरीयस पेशन्ट आहेत, तुम्ही कशी काय लाईन कट करू शकता? असे म्हणून माझी गच्ची धरुन मला हाताबुक्यांनी तोंडावर, उजव्या डोळ्याजवळ, छातीवर मारहाण करू लागले. मी त्यास समजावीत होतो; परंतु त्याने माझे काहीच ऐकले नाही. यावेळी माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी माझी त्यांच्यापासून सोडवणूक केली. तेव्हा त्या दोघांनी मला यापुढे आमच्या घरी बिल वसुलीला आला तर तुला मारुन टाकू, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत भटेसिंग पाटील याने माझ्या अंगावरील काळ्या रंगाचा शर्ट समोरील बाजूस फाडला. त्यावेळी जवळपास राहणाऱ्या लोकांची गर्दी जमली होती. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात उपकार्यकारी अभियंता सचिन भीमराव माळी (३३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत.