शहादा पालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू, वॉर्ड रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:34+5:302021-08-21T04:35:34+5:30
शहादा पालिका ही ब वर्ग नगरपालिका आहे. जिल्ह्यात नंदुरबारनंतर शहादा पालिका मोठी आहे. गेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड ...

शहादा पालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू, वॉर्ड रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
शहादा पालिका ही ब वर्ग नगरपालिका आहे. जिल्ह्यात नंदुरबारनंतर शहादा पालिका मोठी आहे.
गेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होती. त्यामुळे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्यात आले, तर १३ प्रभागांतून २७ नगरसेवक निवडून देण्यात आले होते. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत तिरंगी लढत रंगली होती. भाजपतर्फे मोतिलाल पाटील, कॉंग्रेसतर्फे प्रा. मकरंद पाटील, तर अपक्ष म्हणून शेख जहीर शेख मुशीर यांनी निवडणूक लढविली होती. त्यात भाजपचे मोतिलाल पाटील हे विजयी झाले होते. परंतु सर्वाधिक नगरसेवक हे कॉंग्रेसचे निवडून आले होते. एमआयएमनेदेखील येथे मोठे यश मिळविले होते.
पाच वर्षांत शहराच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. त्यामुळे पूर्वीचे राजकीय गणित आता बदलले असून, नवीन राजकीय परिस्थितीनुसारच निवडणुका रंगण्याची शक्यता आहे.
२७ वॉर्ड राहण्याची शक्यता
शहादा पालिकेची लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता २७ सदस्य संख्या व वॉर्ड राहणार आहेत, तर स्वीकृत नगरसेवकांची संख्या तीन राहणार आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासनातर्फे कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा मंगळवार, २४ रोजी होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या बैठकीत तपासून त्याला प्राथमिक स्वरूपात मान्यता दिली जाणार आहे. या प्रक्रियेला किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मतदार याद्या अंतिम तयार करण्यापूर्वी आणखी एक वेळा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार याद्या जाहीर करून त्यावर हरकती घेऊन नंतर मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे.
कोरोनाची लाट न आल्यास ठरल्या वेळेस शहादा पालिकेची निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे. गेल्या वेळी डिसेंबर महिन्यात निवडणूक झाली होती. यंदाही डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रशासन आणि राजकीय पक्षांनीदेखील तयारीला वेग दिला आहे.
धडगाव नगरपंचायतीचीही निवडणूक
धडगाव नगरपंचायतीची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. या ठिकाणी वॉर्डरचनादेखील झालेली आहे. परंतु कोरोनामुळे या ठिकाणची निवडणूक घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रशासक नियुक्त कारभार या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात या ठिकाणीदेखील निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे.