नंदुरबारातील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:42 IST2020-05-08T18:41:51+5:302020-05-08T18:42:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचा मृत्यू ...

An elderly woman from Nandurbar died due to corona | नंदुरबारातील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

नंदुरबारातील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याने नंदुरबारात खळबळ उडाली आहे. अहवाल येताच यंत्रणेने तातडीने वृद्धा राहत असलेला अहिल्यादेवी चौक परिसर सील केला आहे. याशिवाय आधीच सील केलेले रुग्णालयाचा परिसरातही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २१ झाली असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नंदुरबारातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या महिलेचा अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच धावपळ उडाली. महिलेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दुपारीच या महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
ही महिला नंदुरबारातील अहिल्या देवी विहिर चौकात राहणारी आहे. त्यामुळे तातडीने या भागात प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. प्रांताधिकारी वसुमना पंत, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांच्या टिमने या भागात बॅरिकेटींग लावून परिसर सील केला. शिवाय पालिकेतर्फे तातडीने सॅनिटाईज देखील करण्यात आले.
या महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांना लागलीच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. शिवाय महिलेच्या संपर्कातील इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही दोन झाली आहे. तर एकुण रुग्णसंख्या २१ झाली आहे. त्यापैकी पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत.


 

Web Title: An elderly woman from Nandurbar died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.