तोरणमाळजवळ घाटात जीप कोसळून आठ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST2021-07-19T04:20:30+5:302021-07-19T04:20:30+5:30
हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. गाडी दरीत कोसळली तेव्हा काही जणांनी जीव ...

तोरणमाळजवळ घाटात जीप कोसळून आठ जण ठार
हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. गाडी दरीत कोसळली तेव्हा काही जणांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून बाहेर उड्या टाकल्यामुळे जबर मार लागून काही जखमी झाले आहेत. दरीत ज्या ठिकाणाहून गाडी खाली कोसळली त्या वाटेत ठिकठिकाणी प्रवाशांचे मृतदेह पडून होते.
या गाडीत ३० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदतकार्याला मोठा अडथळा येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली.
अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळसोबत जोडला गेला आहे. मात्र, असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यांत या रस्त्यावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे, हा सगळा भाग मोबाइल नेटवर्क नसलेला आणि खडतरही असल्याने या ठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य राबवत असून जखमींना तोरणमाळ, म्हसावद या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले जात आहे.