पोल्ट्रीच्या शहरातच अंड्यांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:23+5:302021-05-11T04:32:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सर्व दूर ‘पोल्ट्रीचे शहर’ म्हणून परिचित असलेल्या नवापूर शहरात सध्या अंड्यांची टंचाई जाणवत ...

पोल्ट्रीच्या शहरातच अंड्यांची टंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात सर्व दूर ‘पोल्ट्रीचे शहर’ म्हणून परिचित असलेल्या नवापूर शहरात सध्या अंड्यांची टंचाई जाणवत आहे. बर्ड फ्लूमुळे सर्व पोल्ट्री उद्ध्वस्त झाल्याने येथे अंडी मिळणे दुरापास्त झाले आहे. एकीकडे कोरोना संसर्ग वाढल्याने इम्युनिटीसाठी अंड्यांची मागणी वाढली असताना शहरातील अंडी उत्पादन थांबल्याने व्यावसायिकांना गुजरातमधून अंडी मागवावी लागत आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापूर शहरात १९७१ पासून पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळाली आहे. २००१ पासून तर हा व्यवसाय अधिकच भरभराटीला आला होता. पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या या काळात ७० पेक्षा अधिक गेली होती. परंतु २००६ मध्ये बर्ड फ्लू आल्याने हा व्यवसाय पुन्हा डळमळला. मात्र तेवढ्याच लवकर सावरलाही. पोल्ट्री व्यावसायिकांनी नव्या जोमाने व्यवसायाला गती दिली. त्यामुळे २००६च्या बर्ड फ्लू नंतर पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या घटली असली तरी पोल्ट्रीमधील पक्ष्यांची संख्या दुपटीने झाली. गेल्या वर्षापर्यंत या ठिकाणी जवळपास ३५ पेक्षा अधिक पोल्ट्री फार्म सुरू होते. यातील पक्ष्यांची संख्या सुमारे १५ लाखांवर होती. रोज या ठिकाणी २० लाखांहून अधिक अंडी गुजरातमध्ये विक्रीसाठी जात होती. त्यामुळे या व्यवसायातून प्रचंड मोठे अर्थकारण सुरू होते. मात्र २०२०च्या अखेर या ठिकाणी बर्ड फ्लूचा पुन्हा शिरकाव झाल्याने पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त झाला. पहिल्या टप्प्यात त्याचे सौम्य रूप होते. पण जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याची तीव्रता वाढल्याने नवापूरसह गुजरातच्या हद्दीत असलेल्या सर्व पोल्ट्री फार्ममधील पक्षी नष्ट करावे लागले. जवळपास १५ लाख पक्षी नष्ट झाल्याने येथील पाेल्ट्री फार्म आता पक्ष्यांविना रिकामे पडले आहेत. सहाजिकच अंडी उत्पादनही पूर्णपणे थांबले आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट अधिकच तीव्र आल्याने इम्युनिटीसाठी अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते नवापूर शहरात दुसऱ्या शहरातून अंडीविक्रीसाठी येऊ लागली आहे. विशेषत: येथील मोठे व्यावसायिक अहमदाबादहून अंडी मागवत असून, आठवड्यात या शहरात एक लाखाहून अधिक अंडी विक्रीसाठी मागवावी लागत आहे.