सावरकरांच्या तळोदा भेटीच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:16+5:302021-05-28T04:23:16+5:30

तळोदा शहराला स्वातंत्र्य व समाजसुधारकांच्या चळवळीतील अनेक थोर नेत्यांनी भेटी दिल्याचे सांगितले जाते. त्यापैकी काही महापुरुषांच्या भेटी ...

Efforts should be made to preserve the memory of Savarkar's visit to Taloda | सावरकरांच्या तळोदा भेटीच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत

सावरकरांच्या तळोदा भेटीच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत

तळोदा शहराला स्वातंत्र्य व समाजसुधारकांच्या चळवळीतील अनेक थोर नेत्यांनी भेटी दिल्याचे सांगितले जाते. त्यापैकी काही महापुरुषांच्या भेटी या अधिकृत नोंदीअभावी गुलदस्त्यातच आहेत तर काहींच्या अधिकृत नोंदी उपलब्ध आहेत. अधिकृत नोंदी उपलब्ध असणाऱ्या भेटींपैकी १३ मार्च १९४० रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचा तळोदा शहरातील इतिहास प्रसिद्ध बारगळांच्या गढीत दिलेल्या भेटीचा समावेश आहे. इंग्रजांच्या जोखडातून देशाला स्वतंत्र करण्यासाठी सुरू असणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे योगदान राहिले आहे. त्यांनी देशाच्या फाळणीला व काँग्रेसच्या धोरणांना प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची सुरक्षा वाढवणे, शस्त्र सज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह धरला. स्वातंत्र्य लढ्याला रसद पुरविण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतात भेटी देऊन निधी गोळा करण्याचे काम सुरू केले होते. त्याच अभियानाअंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर तळोदा येथे आल्याच्या नोंदी आहेत. तळोदा येथील सामाजिक कार्यकर्ते जहागीरदार अमरजित बारगळ यांचे आजोबा जहागीरदार शंकरराव बारगळ यांनी या भेटीत सावरकरांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. १३ मार्च १९४० रोजी दुपारी दोन वाजता बारगळांच्या गढीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे आगमन झाले. त्यावेळी गावकऱ्यांतर्फे त्यांना देशकार्यासाठी निधीही देण्यात आला असल्याचे इतिहास अभ्यासकांकडून सांगण्यात येते. याप्रसंगी सावरकर यांनी देशभक्तीपर भाषणही केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे सांगितले जाते.

स्मृती जतन करण्यासाठी प्रयत्न आवश्यक

गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असणाऱ्या तळोदा तालुक्याला भौगोलिक स्थानांसह सांस्कृतिक महत्त्व आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अहिल्याबाई होळकरांपर्यंत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यत ऐतिहासिकदृष्ट्याही वेगळे महत्त्व आहे. तळोदा तालुक्यासह शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. १३ मार्च १९४० रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी तळोदा शहराला भेट दिली. या भेटीला ८१ वर्षांचा कालावधी उलटला आहे. एवढा मोठा कालावधी उलटून व नोंदीबाबत अधिकृत नोंदी, पुरावे, दस्तऐवज असताना सावरकरांच्या तळोदा भेटीबाबत अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सावरकरांच्या तळोदा भेटीचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून भेटीच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा येणाऱ्या पुढील पिढ्यांपर्यंत संक्रमित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सावरकरांच्या तळोदा भेटीच्या स्मृतींना उजाळा देऊन त्या जतन करणे आवश्यक आहे. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून स्मृतींना उजाळा देण्यासाठी १३ मार्च रोजी बारगळ गढीला भेट देऊन प्रतिमा पूजन केले जाते. मात्र, या प्रयत्नांना सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय चळवळीच्या मदतीची गरज आहे.

Web Title: Efforts should be made to preserve the memory of Savarkar's visit to Taloda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.