शिक्षणाची सुरू झाली वारी पण विद्यार्थी अद्यापही घरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:08 IST2021-02-05T13:08:02+5:302021-02-05T13:08:17+5:30
नंदुरबार वार्तापत्र मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले, आता १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये ...

शिक्षणाची सुरू झाली वारी पण विद्यार्थी अद्यापही घरी...
नंदुरबार वार्तापत्र
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले, आता १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू होत आहेत. साधारणत: मार्चमध्ये पहिले ते चौथीचेही वर्ग सुरू होण्याची अपेक्षा आहेच. हे सर्व करतांना मात्र विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठीच्या वाहनांचे नियोजन झालेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच नववी ते १२ वीचे वर्ग सुरू होऊन साधारणत: अडीच महिने झाले, परंतु विद्यार्थी उपस्थितीची टक्केवारी ३० टक्केच्या वर जाऊ शकली नाही. पाचवी ते आठवीचे वर्गातील पहिल्या आठवड्याची उपस्थिती देखील २० टक्केच्या आतच राहिली आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याचा आग्रह असतांना दुसरीकडे विद्यार्थी उपस्थितीबाबतही नियोजन होणे आवश्यक आहे.
कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी पूर्वीसारखी या आजाराची भीती आता राहिलेली नाही. आजाराचे गांभीर्य असले तरी किती दिवस तेच कवटाळून बसणार? ही मानसिकता झाल्याने शासनाने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी ते १२ वीचे वर्ग यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर हा प्रयोग देखील बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला आहे. आता महाविद्यालयांचा परिसर गजबजबणार आहे. १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घालून देत ते सुरू होतील. महाविद्यालयानंतर प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाचे आहे. साधारणत: मार्च महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्राथमिक शाळा सुरू होऊ शकतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. हे करतांना त्या त्या इयत्तांचा अभ्यासक्रम देखील किमान २५ ते ५० टक्केपर्यंत कमी करण्यात आलेला आहे.
एकीकडे शाळा सुरू झाल्या असतांना दुसरीकडे शाळांमधील उपस्थिती वाढविण्यासाठीचे नियोजन नसल्याचे चित्र आहे. अद्यापही ६० ते ७० टक्के विद्यार्थी शाळेत येत नाहीत हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. काही आश्रमशाळा तर नुुसत्याच नावाला सुरू आहेत. पाच ते दहा टक्के विद्यार्थी देखील अशा ठिकाणी उपस्थित नसल्याचे चित्र आहे.
या सर्व बाबींना अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात अद्याप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरू न होणे, मानव विकास मिशनसह इतर बसफेऱ्या पूर्वीप्रमाणे नसणे. होस्टेल सुरू करण्याबाबत निर्णय नसणे, शहरी भागात भाड्याने खोली घेऊन विद्यार्थी राहतीलही, परंतु कोरोनामुळे भाड्याच्या खोल्याही न मिळणे, पालकांच्या मनात अद्यापही कोरोनाविषयीची भीती कायम असणे, शाळांकडून, शिक्षण विभागाकडून विद्यार्थी उपस्थितीबाबत पालकांमध्ये जागृती करण्यात यश न येेणे यासह काही कारणे व घटक कारणीभूत आहेत. याशिवाय ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वर्ष असेच गेले आता गेल्या वर्षाप्रमाणेच पुढील वर्गात टाकले जाईल ही मानसिकता रुजली आहे ती मानसिकता दूर करणे आवश्यक ठरणार आहे.
शासनाने आता मानव विकास मिशनच्या सर्व बसेस पूर्वीच्या मार्गांवर सुरू करणे आवश्यक आहे. इतर बसेसच्या फेऱ्या देखील शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत सोडाव्या. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, मिनी बसेस, रिक्षा, व्हॅन यांना परवानगी देण्यात यावी. पालकांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी वेळोवेळी आवाहन करून पाल्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पटवून देणे आवश्यक आहे. शाळा सुरू करतांना ज्या प्रकारे काही बाबींमध्ये, नियमांमध्ये शिथिलता दिली गेली, त्या प्रमाणे विद्यार्थी उपस्थितीबाबत देखील काही निर्णय तातडीने घेऊन शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, शिक्षण विभाग आणि पालकांनी देखील आग्रही भूमिका घेणे आवश्यक ठरणार आहे.