पूर्व भागात कोसळली सुपारीच्या आकाराची ‘गार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:06 IST2019-04-17T12:06:31+5:302019-04-17T12:06:36+5:30
शनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ व बलवंड येथे गारपीटीमुळे कांदा, पपई आणि चवळी पिकांचे नुकसान झाले़ मंगळवारी दुपारी पावणेतीन ...

पूर्व भागात कोसळली सुपारीच्या आकाराची ‘गार’
शनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ व बलवंड येथे गारपीटीमुळे कांदा, पपई आणि चवळी पिकांचे नुकसान झाले़ मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती यानंतर काही क्षणातच गारा कोसळण्यास प्रारंभ झाल्याने गावासह शेतशिवारात शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती़
शनिमांडळ, इंद्रीहट्टी, तलवाडे, तिलाली, सोमनाथनगर आणि आखातवाडे परिसरातील शेतीला गारांचा मोठा फटका बसला़ गारपीटीनंतर तलाठी जयेश राजपूत आणि कृषी सहायक आऱपी़ हिरे यांनी तातडीने पंचनामे सुरु केले़ प्रारंभी झालेल्या पंचनाम्यात पंकज यादव होंडगर यांच्या शेतातील तीन एकर पपई, शंकर लुका महाजन यांची भाजीपाला, भाईदास राम धनगर यांची पपई, विजय यादव होंडगर यांच्या शेतातील चवळी, खंडू यादव होंडगर, सुका यादव होंडगर, विजय होंडगर यांच्या शेतातील कादां आणि चवळीचे पीक निकामी झाले़ रात्री उशिरापर्यंत शनिमांडळ परिसरात पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़ दुपारी कोसळलेल्या गारांच्या पावसामुळे शनिमांडळ परिसरात ठिकठिकाणी गारांचा खच साचला होता़ अवकाळी अशा या पावसानंतर या भागात प्रचंड उकाडा जाणवण्यास प्रारंभ झाला होता़ शेतशिवारातील जनावरेही गारपिटीत सापडल्याची माहिती असून एक-दोन ठिकाणी जनावरे जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते़ सायंकाळनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चिंता निर्माण झाली होती़
दरम्यान बलंवड येथे मुसळधार पावसासह गारपीट झाली़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेल्या पावसामुळे शेतशिवातील बागायती आणि भाजीपाला पिकांचे नुसान झाले़ बलवंड गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरु असलेल्या रजाळे येथील देवीच्या यात्रोत्सवावर परिणाम झाला़ वेगवान वारे आणि पाऊस यामुळे व्यावसायिकांनी टाकलेले तंबू उडून गेले होते़ बलवंड येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली होती़ पावसामुळे गावातील गटारी तुडूंब भरुन वाहू लागल्या होत्या तर रस्त्यांवरही पाणी होते़