लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे पांगळी झाली आहे. अनेक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय अधिकारी नाहीत. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे दुर्गम भागात आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. आता होऊ घातलेल्या आरोग्य कर्मचारींच्या भरतीत ही समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांबाबत नेहमीच ओरड असते. वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत, मिळाले तर ते तेथे राहत नाहीत ही तक्रार कायमची झाली आहे. आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना इमारतींचाही प्रश्न आहे तो आता काही प्रमाणात सुटण्याचा मार्गावर आहे. परंतु कर्मचारी राहत नाही व आरोग्य सेवा मिळत नाही ही समस्या व प्रश्न सुटत नसल्याची स्थिती आहे. दोन तरंगते दवाखाने नर्मदा काठावरील गावांसाठी सुरू आहेत. आता बाईक ॲब्यूलन्स सुरू होणार आहेत. नव्याने १४ रुग्णवाहिका जिल्ह्याला मिळालेल्या आहेत. या उपाययोजना लक्ष वेधून घेत असल्या तरी रिक्त पदांची समस्या सुटणे आवश्यक आहे. तरच आरोग्याची स्थिती सुधारेल.
आकडेवारी
आरोग्य केंद्र - ५८ आरोग्य उपकेंद्र- २९० एकुण कर्मचारी- ९४८ रिक्त संख्या - ३९४
वर्ग एक ते चार ची रिक्त संख्या... जिल्ह्यात आरोग्य विभागात वर्ग एक ते चार श्रेणीच्या अधिकारी, कर्मचारी यांची रिक्तपदे संख्या मोठी आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, युनानी मिश्रक, आरोग्य सेवक व इतर अशी ३९४ पदे रिक्त आहेत.
नव्या भरतीत मिळतील कर्मचारी...आरोग्य विभागाअंतर्गत नव्याने कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीतून जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त पदांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने तसा प्रस्ताव देखील दिला आहे.