नवापूर तालुक्यात दोन वर्षात राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेमुळे बहरले वनक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:30 IST2019-05-17T21:30:27+5:302019-05-17T21:30:48+5:30
पर्यावरण : प्रतापपूर परिसरात शेकडो झाडे सुस्थितीत

नवापूर तालुक्यात दोन वर्षात राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेमुळे बहरले वनक्षेत्र
नवापुर : राज्यशासनाने गेल्या सलग तीन वर्षात केलेल्या वृक्षलागवडींतर्गत नवापूर तालुक्यात दोन लाख रोपांनी तग धरत वनक्षेत्र समृद्ध सहाय्य केले आहे़ लागवड केलेल्या वृक्षांपैकी ९० टक्के वृक्ष हे चांगल्या प्रकारे टिकून असल्याने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट्य साध्य झाल्याचे सांगण्यात येत आहे़
जागतिक तापमान वाढ, हवामान व रुतु बदलाची दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्यात वृक्षारोपणाची प्रभावी मोहिम हाती घेण्यात आली आहे़ २०१६ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात १२ लाख ८३ हजार रोपे लावण्याचे उद्दीष्ट होते. १२ लाख ९१ हजार रोपे लावून उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण जिल्ह्यात झाले. वन विभागाने सर्वाधिक १० लाख ३३ हजार रोपांची लागवड केली होती़ २०१७ मध्येही २४ लाख वृक्ष लागवड तर २०१८ मध्ये ५१ लाख वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला होता़ यातून नंदुरबार वनविभागाने नवापूर तालुक्यात लागवड केलेल्या वृक्षांची स्थिती अत्यंत मजबूत झाली आहे़ तालुक्यातील प्रतापपूर, चिंचपाडा, बिलमांजरे आणि लक्कडकोट या वनक्षेत्रातील रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण हे ९५ टक्के आहे़
तालुक्यातील प्रतापपूर वन क्षेत्रात २०१६ मध्ये ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली. महु, निंब, शिवण, आवळा, बोर, चिच, बेहेड, साग व सीताफळ या रोपांचा त्यात समावेश होता. त्यात केवळ सात टक्के रोपांना मर आला होता़ उर्वरित ३७ हजार रोपे आज चांगल्या प्रकारे वाढली आहेत़ चिंचपाडा वनक्षेत्रातील खोकसा येथे १० हेक्टर क्षेत्रात लावण्यात आलेली सागाची झाडे ही ९९ टक्के शाबूत आहेत़ बिलमांजरे व लक्कडकोट येथील वन क्षेत्रातही लावण्यात लावलेली रोपे ९५ टक्के सुस्थितीत आहेत़ २०१७ आणि २०१८ या वर्षात लावलेली झाडेही येथे चांगल्या स्थितीत आहेत़ जिल्ह्यात २०१८ मध्ये नंदुरबार वनविभागाने १९ लाख १० हजार, तळोदा वनविभाग १६ लाख ९६ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ४ लाख तर इतर विभाग दोन लाख ५० हजार, ग्रामपंचायत सहा लाख ४५ हजार तर अशासकीय संस्थााकडून दोन लाख ६५ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती़ जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात या झाडांचे जगण्याचे प्रमाण ९० टक्के आहे़ उर्वरित ठिकाणी पाण्याअभावी झाडे वाढू शकलेली नाहीत़