शहादा तालुक्यातील कडक उन्हामुळे पिके मोजताहेत शेवटच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:28+5:302021-08-17T04:36:28+5:30
शहादा तालुक्यात यंदा जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता तरीही काही शेतकऱ्यांनी आज ना ...

शहादा तालुक्यातील कडक उन्हामुळे पिके मोजताहेत शेवटच्या घटका
शहादा तालुक्यात यंदा जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता तरीही काही शेतकऱ्यांनी आज ना उद्या बरसेल या आशेवर पेरणीची सुरुवात केली होती. तद्नंतर पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली. ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसावर सर्वत्र पेरणी झाली. पेरणीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके तीव्र उन्हामुळे अखेरची घटका मोजत आहेत. दोन-चार दिवस कडक ऊन पडल्यास खरीप हंगामच वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षी कोरोना, यंदा दुष्काळी परिस्थिती...
गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले होते. शेतात उत्पादित झालेला माल लॉकडाऊनमुळे गल्लोगल्ली कवडीमोल दराने विकावा लागला. परिणामी उत्पादन खर्च अधिक झाल्याने खर्चही निघाला नाही. यंदा वरुणराजा चांगला बरसेल, गेल्या वर्षीची झळ यंदा भरून निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी कर्ज तर काहींनी उधार-उसनवार करून बी-बियाणे खरेदी केले. बियाण्याची पेरणी ही झाली, परंतु पाऊस नसल्याने पुरता खरीपच वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पपई, उसावर रोगाचा प्रादुर्भाव...
दरम्यान, बागायतदार शेतकऱ्यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. कापसावर काही ठिकाणी लाल्या आल्याने कापसाचे क्षेत्र लाल होत आहे. कोवळ्या पिकांना काही शेतकरी चुवा पद्धतीने पाणी घालून पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. त्याचबरोबर इतर पिकेही पावसाअभावी अखेरची घटका मोजत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंगावत आहे.
तालुक्यातील खरीप पीक पेरणी क्षेत्र...
एकूण तृणधान्य-- १०९७४.९५
एकूण कडधान्य-- ३०५४.७
एकूण गळीत धान्य-- ९१७९.९०
एकूण कापूस -- ७१००९.०५
एकूण ऊस -- ५१९३.३०
केळी -- ३९४४.३०
पपई -- ४१११.४०
मिरची --१३६०
इतर भाजीपाला-- १५७.१०