नवीन निर्बंधांमुळे आता वीकेंड घरातच ; नागरिकांची हाॅटेलिंग राहणार पुन्हा बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST2021-06-28T04:21:38+5:302021-06-28T04:21:38+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरी शासनाच्या आदेशानुसार निर्बंधांचे पालन केले जाणार आहे. यानुसार पाच दिवस दुपारी चार ...

नवीन निर्बंधांमुळे आता वीकेंड घरातच ; नागरिकांची हाॅटेलिंग राहणार पुन्हा बंद !
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरी शासनाच्या आदेशानुसार निर्बंधांचे पालन केले जाणार आहे. यानुसार पाच दिवस दुपारी चार तर दोन दिवसांचा जनता कर्फ्यू आहे. यात हाॅटेल व्यावसायिक नाखुशीनेच सहभागी होत असल्याचे चित्र असून दीड वर्षात सततच्या लाॅकडाऊनमुळे पुन्हा चिंता वाढल्या आहेत.
शहरातील हाॅटेल्स व ढाबा चालकांनी नियम पाळण्यास संमती दर्शवली असली तरी यातून नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेस्टॅारंट, हाॅटेल्स नवीन आदेशप्राप्त होईपर्यंत सोमवार ते शुक्रवार या या कालावधीत दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. त्यानंतर घरपोहोच सेवा देण्यास त्यांना मुभा असेल.
शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू लागू राहणार आहे. यामुळे हाॅटेल व्यवसाय १०० टक्के बंद ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोमवार ते शुक्रवार पाच दिवस निम्मे क्षमतेत हाॅटेल सुरू ठेवण्याचे आदेश व्यावसायिकांना प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून त्याप्रकारे व्यवस्थापनाला सूचना करून कामकाज सुरू करण्यात आले आहे.
राज्य शासनाने नव्याने निर्बंध लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. दीड वर्षात हाॅटेल व्यवसायाची हानी झाली आहे. या व्यवसायावर अनेकांचा रोजगार चालतो, हा राेजगार कमी होत आहे. यातून एक संपूर्ण अर्थव्यवस्थाचा डबघाईस आली आहे.
-विजय चाैधरी,
हाॅटेल व्यावसायिक, नंदुरबार.
शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. दीड वर्ष शासनाने दिलेले निर्बंध वेळोवेळी पाळले आहेत. येत्या काही दिवसांसाठीचे हे निर्बंध पाळून व्यवसाय करण्याच्या सूचना हाॅटेल व्यवस्थापनाला दिल्या आहेत. त्यानुसार कामकाज होत आहे.
-डाॅ. अभिजित मोरे,
हाॅटेल व्यावसायिक, नंदुरबार.
काही दिवसांपूर्वी इंदूरहून परत येथे कामावर आलो आहे. आता पुन्हा नियमांचे पालन करण्याचे आदेश आले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस महत्त्वाचे असतात. ग्राहक न आल्यास कामगारांचा रोजगार बुडेल.
-हाॅटेल व्यवस्थापक, नंदुरबार,
गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय चांगला सुरू होता. यामुळे या महिन्याचा पगार पूर्ण मिळणार अशी शक्यता होती. परंतु मालकाला नुकसान झाल्यास माझ्यासह सर्व कामगारांचे वेतन कपातीची भीती आहे.
-स्वयंपाकी, नंदुरबार.