नवरात्रोत्सवावर यंदा दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:21 IST2018-10-08T11:21:05+5:302018-10-08T11:21:11+5:30

नवरात्रोत्सवावर यंदा दुष्काळाचे सावट
नंदुरबार : नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने तयारीला वेग आला आहे. नंदुरबारातील काही मोजक्या मूर्तीकारांकडे देवीच्या मूर्ती तयार झाल्या असून नंदुरबारसह लगतच्या गुजरातमधील मोठी मंडळे देवीच्या मूर्ती घेवून जात आहेत. दरम्यान, यंदा नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. नवरात्रोत्सवात तरी परतीच्या पावसाने कृपा करावी असे साकडे घातले जात आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे आठ दिवसांवर हा उत्सव येवून ठेपला असला तरी पाहिजे तसा उत्साह अद्याप दिसून येत नसल्याची स्थिती आहे. असे असले तरी व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे. नंदुरबारात गणेश मूर्ती कारागिरांपैकी काही कारागिर देवीच्या मूर्ती देखील तयार करतात. गणेशोत्सवानंतर लागलीच या मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. सध्या या मूर्ती तयार झाल्या असून मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती आता घेवून जावू लागले आहेत.
यात्रेची तयारी पुर्ण
नंदुरबारात खोडाईदेवी यात्रोत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसात असतो. त्यासाठी यशवंत विद्यालयाच्या मैदानावर व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली जात असते. यात्रेसाठी आतापासूनच व्यावसायिक दाखल होऊ लागले आहे. येथे संसारोपयोगी साहित्यासह खाण्याच्या पदार्थाचे दुकाने, मनोरंजनाची साधणे, पालख्या आदी येत असतात. त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वाहतूक वळविणार
डीआर हायस्कूल ते खोडाईमाता रस्त्यावरील वाहतूक नवरात्रोत्सवाच्या काळात वळविण्यात येणार आहे. नऊ दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. केवळ दुचाकी वाहनांना हा रस्ता मोकळा राहणार आहे.
मंडळांची संख्या कमी
यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची संख्या अगदीच नगण्य आहे. केवळ रात्रीच्या वेळी देवीचा फोटो ठेवून त्या ठिकाणी गरबा खेळला जात असतो. त्यामुळे अशा मंडळांना नोंदणीची गरज राहत नसल्याचे सांगण्यात आले.
गरबा प्रशिक्षण
नंदुरबारात काही संस्थांनी व व्यक्तींनी यंदा गरबा व दांडिया प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुजरातमधील विविध पद्धतीचे दांडिया व गरबा यांचे प्रशिक्षण स्थानिक व्यक्ती तसेच गुजरातमधून आलेले व्यक्ती देत आहेत. सायंकाळी असे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत.
विविध वस्तूंची विक्री
बाजारात नवरात्रोत्सवानिमित्त विविध वस्तूंची विक्रीत वाढ झाली आहे. लाकडी व लोखंडी दांडिया, महिलांसाठी विविध वेशभूषेचे वस्त्र, मेकअपचा सामान यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आल़े