अतिवृष्टीमुळे रांझणीत पडझड
By Admin | Updated: September 21, 2015 00:19 IST2015-09-21T00:19:59+5:302015-09-21T00:19:59+5:30
शेतकरी हतबल : कापूस, पपई पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे रांझणीत पडझड
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणी येथे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली. रांझणी- येथे व परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी अतिवृष्टी झाल्याने धनराज मंगा मराठे यांच्या जुन्या घराची पडझड झाली. त्यांच्या घराची भिंत कोसळून पत्रे वाकले. किचन ओटय़ाचेही नुकसान झाले. या वेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. तसेच गावाशेजारील राजेंद्र महादेव भारती यांच्या शेतातील कापूस व पपई पिकाचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागवड केलेल्या कापसाची बोंडे लालसर पडत असल्याचे चित्र आहे. तलाठी दौंड यांनी धनराज मराठे यांच्या घराची पाहणी करून पंचनामा केला. बोरद- तळोदा तालुक्यातील निझरा नदीचे पाणी प्रवाह सोडून अन्यत्र वळत असल्याने त्यातून शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. या नदीला वाहण्यासाठी मोड गावापासून पात्र नाही. परिणामी पूर आल्यानंतर नदीचे पाणी कोठेही वळते. हेच पाणी शेतात शिरत असल्याने पिकांचे नुकसान शेतक:यांना सहन करावे लागत आहे. यात कापूस, ऊस, पपई, ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकांना फटका बसत आहे. यासाठी या नदीतील पाण्याला दिशा मिळण्यासाठी नदीचे पात्र खोल करण्यात यावे, अशी मागणी शेतक:यांमधून पुढे येऊ लागली आहे. (लोकमत ब्युरो)