कापसाची उत्पादन क्षमता घटल्याने शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST2021-08-28T04:34:00+5:302021-08-28T04:34:00+5:30
बामखेडा : नवनवीन तंत्रज्ञान व उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेत खर्च करूनही कापसाचे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यातील पश्चिम परिसरात ‘कॉटनबेल्टचा’ ...

कापसाची उत्पादन क्षमता घटल्याने शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल
बामखेडा : नवनवीन तंत्रज्ञान व उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेत खर्च करूनही कापसाचे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यातील पश्चिम परिसरात ‘कॉटनबेल्टचा’ हा पट्टा चांगलाच धोक्यात सापडला आहे. पर्यायाने शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे आपला मोर्चा वळविला असताना निसर्गाचे दुष्टचक्र पाठलाग करत असल्यामुळे व मजुरांची कमतरता भासत असल्याने ‘शेती’ हा व्यवसाय तोट्यात चालल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.
पश्चिम परिसरात त्यातल्या त्यात नंदुरबार जिल्ह्यातील शिरपूर-शहादा तालुक्याच्या तापी नदी परिसरात सर्वाधिक पेरा हा कापसाचा होत आला आहे. नवनवीन तंत्रज्ञान त्यात बिजी एक, बिजी दोनसारखी संकरित वाणे बाजारात आल्याने कापसाच्या उत्पादनात सुरुवातीला रेकॉर्डब्रेक उत्पन्न शेतकऱ्यांना आले. नंतर दिवसेंदिवस ही संकरित वाणही निसर्गाशी एकरूप झाल्याने फवारणीचा खर्च वाढत गेला, पर्यायाने उत्पादन कमी होत गेल्याने कपाशी पीक हे न परवडणारे पीक झाल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा इतर पिकाकडे वळविला आहे; परंतु त्यालाही निसर्गाचा फटका बसत गेल्याने सर्व पिके शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आली आहेत. सध्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून, यांत्रिकीकरणातून शेती करण्यावर जोर असल्याने इंधनाचे वाढलेले भाव शेतकऱ्यांसाठीच मारक ठरत आहेत. बी-बियाणे व रासायनिक खते यांचेही भाव गगनाला भिडले असताना पिकांचे भाव मात्र ‘जैसे थे’ राहत असल्याने उत्पन्न कमी व खर्च जास्त, असे काहीशे चित्र झाल्याने शेती व्यवसाय हा धोक्यात सापडला आहे. मागील वर्षी तर कापसाला पाच हजार रुपये क्विंटलच्या वर भाव नसल्याने तेवढा खर्च तर शेतकरी पहिलेच त्यासाठी करून बसला होता. याही वर्षी तीच परिस्थिती ओढवलेली आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी मजुरांची टंचाई भासत असल्याने खुद्द शेतकऱ्यांना पेरणीसाठीही यांत्रिकी युगाचा वापर करावा लागत असताना कुठे पेरणी खोल झाल्याने सोयाबीन व मका कमी पावसाअभावी उगवलेच नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, आंतरमशागत ज्यात निंदणीसाठीही मजूर मिळत नसल्याने महागड्या तणनाशकांचा वापर शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
नवीन तंत्रज्ञानात शेतकरी प्रयोगातच संपतोय
कापसाच्या बाबतीत विचार केल्यास सुरुवातीला नॉन बीटी कपाशीचे उत्पन्न बऱ्यापैकी होते. त्यात सुधारणा होऊन संकरित बीजी एक कापूस आले असता, उत्पन्नात भर पडली व आता बीजी दोन हे वाण बाजारात आल्यानंतर सुरुवातीला रेकॉर्डब्रेक कापूस शेतकऱ्यांनी पिकविला असताना त्यावर गेल्या एक-दोन वर्षात बोंंडअळीचा प्रकोप जाणवत गेल्याने दिवसेंदिवस कपाशीचे उत्पादन घटत असून, फरदड संपुष्टात आली आहे, तसेच यावर्षी कमी पावसामुळे कपाशीचे पीक पूर्णतः धोक्यात आलेले आहे. दरवर्षी कापसाची लागवड एक लाख हेक्टरपेक्षा जास्त असायची; परंतु या वर्षी त्यात खूप मोठी घट होताना दिसली.
शहादा तालुक्यातील खरीप पीक पेरणी क्षेत्र
एकूण तृणधान्य १०९७४.९५
एकूण कडधान्य ३०५४.७
एकूण गळीत धान्य ९१७९.९०
एकूण कापूस ७१००९.०५
एकूण ऊस ५१९३.३०
केळी ३९४४.३०
पपई ४१११.४०
मिरची १३६०
इतर भाजीपाला १५७.१०