‘भिशीवाल्या’ त्या दाम्पत्यास अखेर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:03 IST2020-07-12T12:03:23+5:302020-07-12T12:03:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भिशी आणि रियल इस्टेटच्या व्यवहारात शहरातील काहींची फसवणूक करुन फरार झालेल्या दाम्पत्यासह युवतीस पोलीसांनी ...

The 'drunk' couple was finally arrested | ‘भिशीवाल्या’ त्या दाम्पत्यास अखेर अटक

‘भिशीवाल्या’ त्या दाम्पत्यास अखेर अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भिशी आणि रियल इस्टेटच्या व्यवहारात शहरातील काहींची फसवणूक करुन फरार झालेल्या दाम्पत्यासह युवतीस पोलीसांनी अटक केली आहे़ या दाम्पत्याकडून फसवणूक झालेल्या इतरांनीही पुढे यावे असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे़
लॉकडाऊनपूर्वी शहरातील देसाईपुरा भागात भिशीच्या व्यवहारात काहींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता़ यातून शहर पोलीस ठाण्यात सुभाष छगन चौधरी, प्रमिलाबाई सुभाष चौधरी यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने पती-पत्नीने शहरातून काढता पाय घेतला होता़ दरम्यान कोरोना महामारीमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे या घटनेचा तपास काहीसा मंदावला होता़ मात्र पोलीसांचा शोध सुरू होता़ यात सुभाष चौधरी, प्रमिला चौधरी आणि त्यांची भाची बाली ऊर्फ निता गणेश चौधरी या तिघांनी अटकपूर्व जामिन मिळवण्याचा प्रयत्न केला होता़ मात्र न्यायालयाने जामिन देण्यास नकार दिला होता़ पोलीसांकडून पती-पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते़ यातच तिघांचा शोध लागल्याने दाम्पत्यासह निता चौधरी हिला अटक करण्यात आली होती़ तिघांना अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते़ न्यायालयाने १३ जुलैपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे़
तिघांची पोलीस चौकशी सुरू असून फिर्याद देणाऱ्यांसह आणखी कोणी या तिघांकडून फसवले गेले असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी केले आहे़ या घटनेचा तपास पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ व पोलीस नाईक विजय चौधरी करत आहेत़


अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याने शहरातील काहींची रियल इस्टेट खरेदीतही फसवणूक केल्याची माहिती आहे़ दरम्यान ३७ लाख रुपयांची भिशीची आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे़ येत्या काळात यांच्याविरोधात तक्रारी आल्यास अपहाराच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे़ १३ जुलै रोजी तिघांची पोलीस कोठडी संपण्यापूर्वी या तक्रारी मिळाल्यास तपासाला दिशा मिळणार असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे़

Web Title: The 'drunk' couple was finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.