दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:23 IST2019-11-17T14:23:25+5:302019-11-17T14:23:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे पाऊस होण्याची ...

दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे सुरू आहे. अचानक पाऊस सुरु झाल्यास तातडीने शेतमाल झाकता यावा यासाठी दुर्गम भागातील काही शेतक:यांनी धावपळ करीत प्लॅस्टिकवर मळणी सुरू केली आहे.
दुर्गम भागात प्रतीकुल भौगोलिक परिस्थीतीमुळे नगदी पिके घेतली जात नसून केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली अन्न-धान्याचीच पिके घेतली जात आहे. त्यात ज्वारी, मका, उडीद,भात व भगरवर्गिय सहा-सात प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. परंतु या अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिके सडल्याने नुकसान झाले. जी पिके हाती आली ती पिकेही पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होत असल्याने धोक्यात सापडली आहे. हातातली पिके वाचविण्यासाठी धडगाव व मोलगी भागातील शेतक:यांची धावपळ सुरू आहे. धडगाव तालुक्यातील वेलीआंबा, चिंचकाठी, उखळीआंबा, काकरपाटी, पिंपळबारी तर अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, काठी, चनवाई या परिसरातील शेतक:यांनी मळणीच्या कामांना सुरूवात केली आहे. तर सुरवाणी, खांडबारा, खडक्या, मोजरा, कुंडल, खुंटामोडी या परिसरातील शेतक:यांनी भात पिकाच्या मळणीवर भर दिला आहे. परंतु आजही पावसाचे वातावरण कायम राहिल्यामुळे शेतक:यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
दुर्गम भागात पिके मळणीसाठी मोठ-मोठी तथा कायमची खळे तयार करण्यात आली आहे. सर्व खळे मळणीसाठी सुस्थितीत असतानाही केवळ पावसाच्या भितीमुळेच प्रत्येक शेतक:यांकडून प्लॅस्टिकचा वापर करण्यात येत आहे. अचानक पाऊस सुरू झाल्यास तातडीने खळ्यातला शेतमाल व मळणी सुरू असलेली पिके झाकता यावी म्हणून प्लॅस्टिकवर मळणीची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरलेली पिके तरी सुरक्षीत राहती अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
घास हिरावला
पावसावर अवलंबून असलेली शेती करणा:या दुर्गम शेतक:यांची पिके अतिवृष्टीनंतर अवकाळी पावसाने हिरावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असल्याचे सांगण्यात येत आहे.