नाले सफाई औपचारिकता नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:07 IST2019-05-06T12:07:28+5:302019-05-06T12:07:41+5:30
पालिकेकडून कामाला सुरुवात : वसाहतीनिहाय सर्व्हेची मागणी, ड्रेनेजचही दुरूस्ती करावी

नाले सफाई औपचारिकता नको
नंदुरबार : पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून वसाहतींमध्ये पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडत असतात. ही बाब लक्षात घेता पालिकेतर्फे मान्सूनपूर्व नाले सफाईला वेग आला आहे. शहरातील स्वच्छता ठेकेदार संस्थेतर्फे हे काम केले जात आहे. मंगळबाजारातील शहजादा नाल्याच्या सफाईपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांना नंदुरबार पालिकेने सुरुवात केली आहे. आधी शहरातील व शहरालगतचे सर्व नाले सफाई करण्यात येणार आहेत. त्यानंतर भुमिगत गटारी व त्यांचे चेंबर आणि नंतर उतारावरील घरांच्या परिसरात दरडी कोसळू नये यासाठीची उपाययोजना होणार आहे. शिवाय पडके घर व ईमारतींच्या मालकांना देखील नोटीसा दिल्या जाणार आहेत.
नंदुरबारात एकुण तीन नाले आहेत. त्यापैकी दोन नाले शहरातून वाहत जातात. त्यातील मुख्य आणि मध्यवर्ती भागातून वाहत जाणारा शहजादा नाला. पूर्वी हा नाला थेट गवळीवाडा टेकडीपासून होता. कालांतराने वसाहत झाल्यानंतर तो बुजला गेला. आता त्याला मंगळ बाजारापासून भुमिगत स्वरूपात करण्यात आले आहे. त्यावर शास्त्री मार्केट भागात व्यापारी संकुल देखील बांधण्यात आले आहे. त्यामुळे या नाल्याची सफाई करणे म्हणजे मोठे दिव्य असते. परिणामी शक्य होईल तेवढ्या प्रमाणात त्याची स्वच्छता केली जाते. पावसाळ्यात गवळीवाडा, भोईगल्ली भागातून वाहून येणारे पाणी व घाण मंगळ बाजारातील भागात अडकल्यावर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरते. त्यामुळे दररोज या ठिकाणी कचरा साफ करावा लागत असतो.
याशिवाय दुसरा नाला हा भोणे रस्त्याने येवून हरीभाऊ नगर, गांधीनगर, गाझीनगर या भागातून पुढे पाताळगंगा नदीला जावून मिळतो. या नाल्यात देखील परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा टाकत असल्यामुळे तो तुंबतो. सुदैवाने त्याची खोली जास्त असल्यामुळे पावसाळ्यात त्याचा फारसा त्रास होत नाही. असे असले तरी या नाल्याची देखील सफाई केली जात असते.
माळीवाडा भागातून देखील नाला गेलेला आहे. त्याचीही सफाई करण्यात येणार आहे.
ड्रेनेज व चेंबरची दुरूस्ती
शहरात भुमिगत गटार आहे. परंतु ती सर्वच भागात यशस्वी झालेली नाही. परिणामी अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबून चेंबरमधून पाणी बाहेर येत असते. त्यामुळे अशा ठिकाणांचा सर्व्हे करून पालिकेने त्याची दुरूस्ती करावी. बऱ्याच ठिकाणी चेंबर खराब झालेले आहे. त्याचीही दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक ठरणार आहे