लॉकडाऊनच्या काळात कारवाईची वेळ येऊ देऊ नका -पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST2021-03-28T04:29:01+5:302021-03-28T04:29:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क १ ते १५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी बंदोबस्तावरील पोलीस व एकूणच प्रशासनाला सहकार्य करावे. पोलिसांची नेहमीच ...

Don't let the time of action come during the lockdown - Superintendent of Police | लॉकडाऊनच्या काळात कारवाईची वेळ येऊ देऊ नका -पोलीस अधीक्षक

लॉकडाऊनच्या काळात कारवाईची वेळ येऊ देऊ नका -पोलीस अधीक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क

१ ते १५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी बंदोबस्तावरील पोलीस व एकूणच प्रशासनाला सहकार्य करावे. पोलिसांची नेहमीच मदतीची आणि सहकार्याची भूमिका राहिली आहे. परंतु जर वारंवार नियम तोडले जात असतील तर नाइलाजाने कारवाईचा बडगा उगारावा लागतो. सध्याची कोरोनाची बिकट स्थिती पाहता ती वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन करीत जिल्हा व राज्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना दिली.

संपूर्ण लॉकडाऊनच्या काळातील पोलिसांचे नियोजन कसे व काय आहे?

जिल्हाधिकारी यांनी १ ते १५ एप्रिल दरम्यान संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या काळात जिल्ह्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर अर्थात जिल्हा व राज्य सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी केली जाणार आहे. कारण नसताना प्रवास करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल. शहरी भागात अर्थात नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा येथे गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात येईल. ज्या वेळेत सूट असेल त्या वेळेत भाजीमंडई व फेरीवाले यांच्यासाठी ठरावीक जागा देण्यात याव्या, जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबत संबंधित पालिकांना कळविण्यात आले आहे. प्रत्येक पॅाइंटवर पोलीस बंदोबस्त असेल.

पोलिसांच्या आरोग्याच्या काळजीचे काय?

बंदोबस्तावरील पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याचीही जबाबदारी आमची आहे. त्यानुसार व्याधी नसलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यावर भर असेल. फेसमास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज यांचा वापर करण्याच्या सक्त सूचना आहेत. नागरिकांशी बोलताना, कारवाई करताना ठरावीक अंतर ठेवले जाणार आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणीसाठी प्रयत्न राहणार आहेत. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार नाही या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत.

दंडात्मकसह थेट गुन्हे दाखलची कारवाई...

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक तसेच थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे संयम बाळगा व घरातच थांबा एवढेेच आवाहन करता येईल. रुग्ण वाढत आहेत, रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत, सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.

आंतरराज्य, आंतरजिल्हा वाहतूक...

प्रवासी वाहतूक वगळता शेतीमाल, जीवनावश्यक वस्तू, औषधी, बांधकाम साहित्य यासह इतर सर्व वाहतुकीला परवानगी आहे. मात्र त्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

सण, उत्सव घरातच...

आगामी सण, उत्सवाच्या काळात घरातच थांबा, घरात राहूनच ते साजरे करा. ऑनलाइनच्या माध्यमातून सहभागी व्हा, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

Web Title: Don't let the time of action come during the lockdown - Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.