दानपेटीतील रक्कम गरजू मुलीच्या शिक्षणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 20:54 IST2019-04-15T20:54:22+5:302019-04-15T20:54:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे श्रीराम नवमीनिमित्त दानपेटीत आलेली रक्कम अनाथ मुलीला शैक्षणिक कामासाठी देऊन ...

दानपेटीतील रक्कम गरजू मुलीच्या शिक्षणासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे श्रीराम नवमीनिमित्त दानपेटीत आलेली रक्कम अनाथ मुलीला शैक्षणिक कामासाठी देऊन धार्मिकतेला शिक्षणाची जोड देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
प्रकाशा येथील पुरातन काळातील पूर्वमुखी श्रीराम मंदिरात श्रीरामनवमीला भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती. या दुमजली मंदिरात राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे पुजारी म्हणून प्रशांत बंडू उपासनी हे काम पाहतात. श्रीराम नवमीनिमित्त येथे पूजाअर्चा, आरती व प्रसाद वाटप करण्यात आला. श्रीराम नवमीनिमित्त भाविकांनी दानपेटीत दानही टाकले.
दिवसभरात प्रभू श्रीरामाच्या चरणी आलेले सर्व दान येथील सर्वोदय विद्यामंदिरातील गरजू व हुशार अशा विद्यार्थिनीचा त्यांनी शोध त्या विद्यार्थिनीला हा सर्व पैसा त्यांनी तिच्या शैक्षणिक कामासाठी दान केला. या मुलीला वडील नसून आई धर्मशाळेत काम करते. मामाला रातआंधळेपणाचा त्रास आहे. म्हणून या विद्यार्थिनीला शैक्षणिक कामासाठी हा पैसा देण्यात आला. याप्रसंगी अॅड.सुशील पंडित, अॅड.प्रफुल्ल पाठक, किशोर मुरार चौधरी, प्रशांत उपासनी, हितेश नंदलाल वाणी, प्रा.प्रकाश पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. मागीलवर्षीही श्रीराम नवमीला आलेले दान कर्करोगाने पीडित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी देण्यात आला होते.