१२४ फरार आरोपींना जिल्हा पोलिसांनी वर्षभरात केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:27 IST2020-02-03T12:26:48+5:302020-02-03T12:27:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा पोलिसांनी वर्षभरात तब्बल १२४ फरार आरोपींना जेरबंद केले. यात अनेक कुख्यात फरार आरोपींचा ...

१२४ फरार आरोपींना जिल्हा पोलिसांनी वर्षभरात केले जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा पोलिसांनी वर्षभरात तब्बल १२४ फरार आरोपींना जेरबंद केले. यात अनेक कुख्यात फरार आरोपींचा देखील समावेश आहे. यासाठी वेळोवेळी ६५ पोलीस कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथके स्थापन करण्यात आली होती.
जिल्ह्यात पाहिजे व फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष मोहिम सुरू केली होती. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षीत देखील करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, त्या त्या भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर नवले यांच्या पर्यवेक्षणाखाली सर्व पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, पाच कर्मचारी असे १३ पोलीस अधिकारी व ६५ पोलीस कर्मचाºयांचा त्यात समावेश होता.
पोलिसांनी राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, पंढरपूर, धुळे या भागासह मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये जावून संशयीतांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते.
अनेक गंभीर गुन्ह्यातील असलेले हे आरोपी फरार असल्यामुळे न्यायलयीन कामकाजात देखील आडकाठी येत होती. त्यामुळे अशा आरोपींना पकडून त्यांना न्यायालयासमोर उभे करून संबधीत गुन्ह्याची केस चालवावी यासाठी ही मोहिम राबविण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांच्या गुन्ह्यातील कडक शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात संबधीत गुन्ह्यातील ठोस कागदपत्रे, पुरावे व साक्षी सादर केल्या जाणार आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक कमलाकर चौधरी, हर्षल बागल, प्रवीण पाटील, राजेश पाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी केली.
पोलिसांनी जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या काळात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दरोड्याच्या गुन्ह्यातील तीन, दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आठ, घरफोडीच्या गुन्ह्यातील एक, चोरीच्या गुन्ह्यातील पाच, दंगलीच्या गुन्ह्यातील ३९, खंडणीच्या गुन्ह्यातील दोन, फसवणुकीच्या गुन्ह्यातील ६० आरोपींसह विविध कलमान्वये दाखल असलेल्या इतर गुन्ह्यातील सहा आरोपींचा त्यात समावेश आहे. यामुळे इतरही फरार आरोपींचे धाबे दणाणले आहे.