प्रवेश प्रक्रियेत जिल्हा सर्वाधिक उदासिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 20:24 IST2019-05-08T20:24:04+5:302019-05-08T20:24:22+5:30
आरटीई : प्रवेश मुदत संपण्यास दोन दिवस उरले तरी केवळ ७८ विद्यार्थी प्रवेशित

प्रवेश प्रक्रियेत जिल्हा सर्वाधिक उदासिन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खाजगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश योजना म्हणजेच आरटीईअंतर्गंत प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा राज्यात सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे वृत्त आहे़ प्रवेश प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक असताना केवळ ७८ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली आहे़
शिक्षक हक्क कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश परीक्षा २०१९-२०२० राबविण्यात येत आहे़ यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ४७ शाळांमार्फत ४७० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी जिल्हाभरातून एकूण ५७३ अर्ज दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर ८ एप्रिल रोजी पुणे येथे काढण्यात आलेल्या पहिल्या सोडतीमध्ये प्रवेशासाठी १४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती़
दरम्यान, यापैकी आतापर्यंत केवळ ७८ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली आहे़ प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीला २८ एप्रिलपर्यंत अंतीम मुदत देण्यात आली होती़ परंतु प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत पालक तसेच विविध संघटनांकडून दबाव वाढू लागल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी ४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली़ त्यानंतर शिक्षण विभागाकडून १० मेपर्यंत पुन्हा मुदवाढ देण्यात आलेली आहे़ परंतु तरीदेखील नंदुरबारात अगदी कासवगतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने यंदाही सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार प्रवेश प्रक्रियेत पिछाडीवरच राहतोय की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़
इतर जिल्ह्यांचा विचार करता, जळगावात १४१ शाळांमार्फ त १ हजार ४३ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ आतापर्यंत २ हजार ७२६ आॅनलाईन अर्ज करण्यात आले आहे़ पैकी ७६६ विद्यार्थ्यांची निवड होऊन ६०५ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झालेली आहे़ धुळ्यात ९७ शाळांमार्फत १ हजार २३७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी २ हजार ३५५ अर्ज दाखल करण्यात आले आहे़
निवड झालेल्या ८१० विद्यार्थ्यांपैकी ५९२ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली आहे़ नाशिकमध्ये ४५७ शाळांमार्फत ५ हजार ७३५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून एकूण १४ हजार ५०८ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पैकी, ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ तसेच आदिवासी जिल्हे म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली येथेही ८२ शाळांमार्फत ७८४ जागांसाठी १ हजार २६६ अर्ज दाखल करण्यात आले होते़ त्यासाठी ५१० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती़
यापैकी २९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ पालघर येथे २२२ शाळांमार्फत ४ हजार २५२ जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत केवळ १ हजार ३२४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ ३८८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून प्रत्यक्षात केवळ २९४ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झालेली आहे़ त्यामुळे इतर आदिवासी जिल्ह्यांच्या तुलनेतदेखील आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे़
मागील वर्षी आरटीईअंतर्गत जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला चार प्रवेश फेºया घेण्याची वेळ आली होती़
तरीदेखील मागील वर्षी एकूण १३७ आरटीईच्या जागा शिल्लक होत्या़ तेच आताही होतय की काय अशी भिती शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार वेळापत्रकात बदल, तारखांचा घोळ आदी सावळा गोंधळ या आधीच झालेला आहे़ तसेच आरटीई प्रवेशासाठी अनेकांकडून लॉबिंगदेखील सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़
दरम्यान, अजून निम्म्याहून अधिक आरटीईच्या जागा रिक्त असल्याने यंदाही अनेक प्रवेश फेºया होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली़