जिल्ह्याच्या आरोग्याची सुरू झाली तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 12:44 IST2020-10-29T12:44:36+5:302020-10-29T12:44:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा दाैर्यावर आलेल्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या २८ संचालक दर्जाच्या अधिकार्यांनी बुधवारी ३२ प्राथमिक आरोग्य ...

जिल्ह्याच्या आरोग्याची सुरू झाली तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा दाैर्यावर आलेल्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या २८ संचालक दर्जाच्या अधिकार्यांनी बुधवारी ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोन ग्रामीण रुग्णालयांची पाहणी केली. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने आरोग्य विभागाचे अधिकारी दाखल झाले असल्याने जिल्ह्याची आरोग्य तपासणी सुरू असल्याचे चित्र सकाळपासून निर्माण झाली होती.
आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांच्या नेतृत्त्वात रविंद्र शेळके, डाॅ. सतीष पवार, डाॅ. नितीन अंबाडेकर, डाॅ. विजय कंदेवाड, डाॅ. फारुखी, डाॅ. पटनशेट्टी, डाॅ. उमेश शिरोडकर, डाॅ. अरुण यादव, डाॅ. एस.पी.सूर्यवंशी, डाॅ. सतीष डोईफोडे, डाॅ. जाधव, डाॅ. गोविंद चाैधरी, डाॅ. नितीन भालेराव, डाॅ. एस.जी.काळे, डाॅ. दुर्योधन चव्हाण, डाॅ. राजेश कतरे, डाॅ. देशपांडे, डाॅ. ब्रह्मानंद, डाॅ. वाकचाैरे, डाॅ. नागेश गाडेकर, डाॅ. प्रकाश पाडवी आदी २८ संचालक, सहसंचालक व उपसंचालक दर्जाचे अधिकारी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले होते. बुधवारी सकाळी धडगाव, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि नंदुरबार तालुक्यात या अधिकार्यांनी भेटी दिल्या. यात प्रामुख्याने तीन अधिकार्यांचे एक पथक रवाना झाले होते. प्रामुख्याने धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यावर विशेष नजर ठेवत आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांच्यासह १२ वरिष्ठ अधिकारी रवाना झाले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाेबतच उपकेंद्र व गर्भवती मातांच्या भेटी घेतल्या. या पथकांकडून भेटीचे लाईव्ह रिपोर्टींग सुरू असून रुग्ण, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यासोबत साधल्या गेलेल्या संवादाच्या नोंदी घेण्यात आल्या.
या आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांना दिल्या भेटी
अधिकार्यांनी धडगाव तालुक्यातील चुलवड, तलाई, धनाजे, तेलखेडी, झापी, रोषमाळ, कात्री, अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा, काठी, डाब, उर्मिलामाळ, होराफळी, ब्रिटीश अंकुश विहिर, खापर, ओहवा, तळोदा तालुक्यातील सोमावल, बोरद, नवापूर तालुक्यातील प्रतापपूर, झामणझर, वावडी, पळसून, डोगेगाव, नंदुरबार तालुक्यात शनिमांडळ, कोपर्ली, नटावद, शहादा तालुक्यात कुसुुमवाडा, पाडळदा, कलसाडी, शहाणा, वाघर्डे, पुरूषोत्तमनगर आणि मंदाणा आरोग्य केंद्राना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान पथकांनी अक्कलकुवा व खांडबारा ता. नवापूर येथील ग्रामीण रुग्णालयांना भेटी देत सुविधांचा आढावा घेतला.
संचालक अर्चना पाटील यांची अतीदुर्गम भागात भेट
आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांनी बुधवारी सकाळी तोरणमाळपासून पुढे असलेल्या झापी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या कुंड्या येथील आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. याठिकाणी त्यांनी माता व कुपोषित बालकांची तपासणी करुन चर्चा केली. मातांना जाणवणार्या समस्या तसेच कुपोषण निर्मुलनासाठी चालवण्यात येणार्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. धडगाव तालुक्यातील तलाई, अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटीश अंकुशविहिर या आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रांना भेटी देत अधिकार्यांनी कुपोषित बालकांच्या पालकांच्या भेटी घेत त्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. मातृवंदना योजनेसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना कशाप्रकारे राबवल्या जात आहेत याची माहिती वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांच्याकडून घेण्यात आली.