कोविड रुग्णालयात उभारणीच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST2021-04-21T04:30:23+5:302021-04-21T04:30:23+5:30

तळोदा येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी उपजिल्हा रुग्णालयाला व प्रस्तावित ऑक्सिजनयुक्त कोविड केंद्राच्या ...

District Collector's displeasure over preparations for construction at Kovid Hospital | कोविड रुग्णालयात उभारणीच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

कोविड रुग्णालयात उभारणीच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

तळोदा येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी उपजिल्हा रुग्णालयाला व प्रस्तावित ऑक्सिजनयुक्त कोविड केंद्राच्या इमारतीला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत आमदार राजेश पाडवी, प्रभारी उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय पाटील, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अनंत जवादवार, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर, सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

सुरुवातीला डॉ. भारुड यांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या ३५ खाटांच्या कोविड रुग्णालयात जाऊन सोयी-सुविधांची पाहणी केली. काही सुधारणा सुचवत त्या ठिकाणी खाटांची संख्या वाढविणे शक्य असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी तालुका लघू पशू चिकित्सालयाच्या नूतन इमारतीत उभारण्यात येत असलेल्या ५० ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. या इमारतीचे काम बाकी असल्याने तत्काळ कोविड सेंटर कार्यान्वित होऊ शकत नाही, असे पाहणी दरम्यान त्यांनी सांगितले. या इमारतीपेक्षा पालिकेचे आदिवासी सांस्कृतिक भवन चांगले होते, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले. या ठिकाणी लवकरात लवकर उर्वरित कामे पूर्ण करावीत, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे येथे वापरात नसलेले बेड या ठिकाणी आणावेत, प्रस्तावित कोविड सेंटरमध्ये पहिले पलंग बसवा, विद्युत जोडणीचे काम तत्काळ करा, टेबल फॅन आणा व ऑक्सिजनचीदेखील तत्काळ सोय करा, अशा सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.

उपजिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत ३५ ऑक्सिजन बेड असून १५ साधे बेड आहेत. उपजिल्हा रुग्णालयात नव्याने १६ बेडची व्यवस्था करून ५१ ऑक्सिजनयुक्त रुग्णांसाठी उपलब्ध करून घ्या. गरीब रुग्णांना बेड मिळणार नाही, असे होता कामा नये. गरज वाटली तर ऑक्सिजन लावा. तळोदा व परिसरातील रुग्णांना सर्व सुविधा तलोद्यात उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे. एकही रुग्ण बाहेर जाता काम नये. हे सर्व करत असताना काही अडचण असेल तर आमदारांची मदत घ्या, रुग्णांना सेवा मिळणे महत्त्वाचे आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोविड रुग्णालय उभारले जात असताना व बेडची संख्या वाढविली जात असताना वैद्यकीय अधिकारी, नर्स इत्यादी मनुष्यबळदेखील उपलब्ध करून देण्याची मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी केली. यास सकारात्मक प्रतिसाद देत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शवली. शहरातील डॉक्टरांची यादी मागविली असून नगराध्यक्षांनी शहरांतील डॉक्टरांना कोविड रुग्णालयात सेवा देण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी म्हटले. काम करण्यास तयार असणाऱ्या डॉक्टरांचे अधिकृत आदेश प्रशासनाकडून निर्गमित करण्यात येतील, अशी माहितीदेखील त्यांनी या वेळी दिली.

या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या सभागृहात सर्व अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर व सुवर्णा सोलंकी हेदेखील उपस्थित होते. सलसाडीव्यतिरिक्त आमलाड व बोरद येथे कोविड सेंटर उभारणीसाठी व त्यासाठी तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बैठकीत दिले. बैठकीनंतर ते सलसाडी येथील कोविड सेंटरच्या पाहणीसाठी गेले.

Web Title: District Collector's displeasure over preparations for construction at Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.