समृद्ध गाव स्पर्धेतील विजेत्या गावांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:44+5:302021-08-14T04:35:44+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले, कृषी तंत्रज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ ...

समृद्ध गाव स्पर्धेतील विजेत्या गावांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले, कृषी तंत्रज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, ‘उमेद’ अभियानाचे किशोर जगदाळे, आदी उपस्थित होते.
समृद्ध गाव स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून खत्री म्हणाल्या, जलसंधारणाचे काम केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता गावाच्या विकासासाठी त्यात निरंतरता ठेवावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे घेण्यात यावी. विहीर पुनर्भरणासारखे उपक्रम हाती घेण्यात यावे. या कामांमुळे शेतकऱ्यांना आणि एकूणच गावाला फायदा होण्यासोबत गावातील वातावरणही सकारात्मक होते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांनी गाव समृद्ध करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
मोरे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून मृदा संधारण, जलसंधारण आणि वायू प्रदूषण कमी करण्याचे काम होत असल्याने या स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा आहे. वृक्षारोपणामुळे गावाला फायदा होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगली कामे करता येतील.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करणाऱ्या दामळदा, लंगडी भवानी, लोंढरे, अंबापूर, फेस, हिंगणी, गोगापूर, कोळपांढरी, कवठळ त. श., भुलाणे, पाडळदा बु., नागझिरी, वीरपूर, नवानगर, कलसाडी, मानमोड्या, काकर्दे खु., जवखेडा, धांद्रे खु. कानडी त.श. या गावांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. बामखेडा त.त., जाम, जयनगर आणि आडगावला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. जलमंदिर, ॲग्रीकल्चर टीम आणि उज्ज्वला पाटील यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.