नर्मदा काठावरील गावांना बोटीने धान्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:21 IST2020-10-23T13:21:22+5:302020-10-23T13:21:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुका प्रशासनाने दुर्गम भागात वसलेल्या भादल गावातील कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बोटीने ...

नर्मदा काठावरील गावांना बोटीने धान्याचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुका प्रशासनाने दुर्गम भागात वसलेल्या भादल गावातील कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बोटीने धान्य पोहोचविले आहे. येथील नागरिकांना रेशन दुकानदारांनी अन्नधान्याचे वितरण केले.
नर्मदा आणि झरकान नदीच्या संगमावर वसलेले भादल हे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेले गाव आहे. दुर्गम भाग असल्याने बोटीने प्रवास करण्याव्यतिरिक्त वाहतुकीसाठी इथे दुसरा पर्याय नाही. राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नागरिकापर्यंत त्याच्या हक्काचे अन्नधान्य पोहोचविण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे नेहमीच करण्यात येतात.
येथील १०२ कुटुंबांना नियमित नियतन आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वाटप करण्यासाठी बोटीने ९४ पोती धान्य पाठविण्यात आले. यासाठी दोन तास बोटीने प्रवास करावा लागला. नर्मदा नदीकाठी धान्य वितरणाची सुविधा करण्यात आली. काही पाड्यावर नदीकाठावर बोटीतच वितरण करण्यात आले. डोंगरावर वसलेल्या वेगवेगळ्या पाड्यातील नागरिक या ठिकाणी येऊन धान्य घेऊन जातात. धान्य मोजण्यासाठी वजनकाट्याची सोयदेखील इथे करण्यात आली.
तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकानदारांनी धान्य वितरणाचे काम पाहिले. सरदार सरोवर प्रकल्पाचे इंजिनिअर प्रविण पाडवी यांनी भूशा पॉईंट येथे बोट उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. स्थानिक नागरिकाचेदेखील या वेळी चांगले सहकार्य लाभले. धडगाव तालुक्यात कोरोना संकटाच्या काळात गेले सहा महिने साधारण ९८ टक्के अन्नधान्य वितरण करून नागरिकांना दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतदेखील गेल्या दोन महिन्यात भादलमध्ये ४७ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आल्याची माहिती सपकाळे यांनी दिली.