११ हजार सीडबॉल व रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:49 IST2021-02-07T11:49:31+5:302021-02-07T11:49:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहाद्याचे नगराध्यक्ष व शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी अँड को-ऑप. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मोतीलाल पाटील ...

११ हजार सीडबॉल व रोपांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहाद्याचे नगराध्यक्ष व शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी अँड को-ऑप. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मोतीलाल पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील कै.डॉ. विश्राम काका शैक्षणिक संकुलात सामाजिक व पर्यावरणपूरक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, नंदुरबार वन विभाग शहाद्याचे उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अभिजित पाटील, प्रीती पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. गिरासे म्हणाले की, शासन स्तरावर वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. परंतु लावलेले वृक्ष जगवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने पुढाकार घेतला पाहिजे. वयाच्या ७५ व्या वर्षीही पर्यावरण जगवण्यासाठी मोतीलाल पाटील यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. उतरत्या वयातही कोविड काळात प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करून प्रशासनालाही मोठी मदत केली, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले. एस.बी. केवटे, तहसीलदार डॉ. कुलकर्णी, दीपक बुधवंत, किशोर हडपे यांनीही मनोगत व्यक्त केले.
शैक्षणिक संकुलात दुपारच्या सत्रात वृक्षारोपण, तुलादान, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वने व पर्यावरण वर्धिष्णू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध प्रजातींच्या वृक्षांच्या १ हजार १७५ रोपांचे वितरण व ११ हजार सीड बॉलचे वितरण करण्यात आले. यावेळी १६ पथके नेमण्यात आले. ही सर्व पथके सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात ज्या ठिकाणी वृक्षराजी नष्ट झाली आहे अशा जागेवर सीड बॉल टाकण्यात आले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला पाहून हा उपक्रम प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.