आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाची निराशा- प्रतिक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:32 AM2021-05-06T04:32:44+5:302021-05-06T04:32:44+5:30

केंद्र व राज्याचा समन्वयाचा अभाव राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयाअभावी आरक्षण रद्द होणे मराठा समाजाच्या दृष्टीने निराशाजनक आहे. ...

Disappointment of Maratha community due to cancellation of reservation | आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाची निराशा- प्रतिक्रीया

आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाची निराशा- प्रतिक्रीया

Next

केंद्र व राज्याचा समन्वयाचा अभाव

राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयाअभावी आरक्षण रद्द होणे मराठा समाजाच्या दृष्टीने निराशाजनक आहे. राज्य सरकार जीव तोडून प्रयत्न करत असतांनाच केंद्र सरकारनेही हातभार लावला असता तर आज निर्णय मराठा समाजाच्या हिताचा झाला असता. मराठा समाज ९०% शेतीवर गुजराण करत असतो. दुष्काळ अवकाळीने शेतकरी पिचलाय. बेरोजगार तरुणांची फौज प्रत्येक गावखेड्यात तयार होत आहे. १०% संपन्न मराठ्यांकडे पाहून आपण ९०% समाजावर अन्याय करत आहोत. ही बाजू समजून घ्यायला हवी होती. केंद्राने ठरविले तर संसदेत कायदा करून मराठा समाजाला घटनात्मक कायमस्वरूपी आरक्षण मिळू शकते.

- राजेंद्र पाटील, विभागीय सचिव, मराठा सेवा संघ, संयोजक सकल मराठा क्रांती मोर्चा, नंदुरबार.

अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. त्यामुळे समाजातील गरीब कुटुंबासह विद्यार्थ्यांचे खूप मोठं नुकसान करणारा हा निर्णय आहे. शांततेने केलेले आंदोलन आणि मूक मोर्चाने काही साध्य होत नसेल तर समाजाला दुसरा मार्ग अवलंबवावा लागेल. आरक्षण कोणत्याही परिस्थितीत घेणारच हे मात्र निश्चित.

- संतोष मराठे, मराठा आरक्षण समन्वय समिती संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य.

मागासवर्गीय आयोगाचा अहवालाचीही दखल नाही

मराठा आरक्षणासंदर्भतील निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे हे धक्कादायक वाटते. ‘देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे आहे, असे असताना मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार का करण्यात आला नाही. नवीन न्यायपीठानेही ही बाब विचारात का घेतली नाही, हे पटत नाही. इतर राज्यांत चालते, मग महाराष्ट्राबाबतच हा दुजाभाव का,’ असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आता राज्य सरकार समाजबांधवांना कसं धीर देते, ही भरपाई कशी भरून काढते हे महत्त्वाचे आहे.

- मधुकर पाटील, पदाधिकारी, मराठा सेवा संघ, नंदुरबार.

तोंडी आलेला घास हिरावून घेतला

आरक्षणासाठी लढत आलेला मराठा समाज आज संतप्त होणे स्वाभाविक आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने काढले गेलेले मोर्चे, अनेक लोकांनी दिलेले बलिदान व जगाने आदर्श घ्यावा असे शिस्तबद्ध मोर्चे काढूनही जर कधी आरक्षण दिले जात नसेल याचे फार मोठे दुःख वाटते. त्यात युवकवर्ग कमालीचा नाराज झालेला दिसून येत आहे. तोंडी आलेला घास हिरावून घेतल्यासारखे प्रत्येकाला वाटते. राजकारण व श्रेय बाजूला ठेऊन सकारात्मक मार्ग काढणे हाच मराठा समाजासाठी योग्य उपाय ठरू शकतो.

- विठ्ठल मराठे, मुख्य समन्वयक, मराठा समाज परिवर्तन चळवळ, नंदुरबार.

सत्य माहिती न्यायालयापर्यंत पोहोचू दिली नाही

ज्यांनी मराठा समाजाची फसवणूक करून न्यायालयापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचं काम केलेलं नाही, अशा प्रवृत्तीचा नाश करावा लागेल. त्यासाठी आपण भव्य दिव्य असं पुन्हा आंदोलन करू पण ती वेळ आजची नसून येणाऱ्या पुढील कालावधीची ठेवावी लागणार आहे. याचा सर्व मराठा समाजाने विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय नेत्याच्या भाषणाला बळी पडून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे कृत्य आपल्याकडून होता कामा नये ही अपेक्षा.

- नितीन जगताप, समन्वयक, सकल मराठा क्रांती मोर्चा, नंदूरबार.

Web Title: Disappointment of Maratha community due to cancellation of reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.