मतीमंद बालिकांना आपल्याच लेकीसारखे सांभाळणारे अपंग पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:57 IST2020-06-21T11:56:18+5:302020-06-21T11:57:54+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुटूंबात मतीमंद मुुलगी जन्मास आल्यावर त्यांचा सांभाळ करणे अनेकांना जिकरीचे जाते. ...

मतीमंद बालिकांना आपल्याच लेकीसारखे सांभाळणारे अपंग पालक
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुटूंबात मतीमंद मुुलगी जन्मास आल्यावर त्यांचा सांभाळ करणे अनेकांना जिकरीचे जाते. परंतु स्वत: पायाने अपंग असूनही त्या व्यंगाची पर्वा न करता आपल्या अर्धांगीणीच्या मदतीने ३० पेक्षा अधीक मतीमंद मुलींची सेवा करणारे नंदुरबार येथील भास्कर कुवर यांची सेवा अनेकांना प्रेरीत करणारी आहे.
नंदुरबारातील गुरुकुल नगर भागात राहणारे भास्कर कुवर हे स्वत: मतीमंद विद्यलायात शिक्षक आहे. तेथील विद्यार्थ्यांचे दु:ख पाहून त्यांनी आपणही अशा मुलांची विशेषत: मुलींची सेवा करण्याचे ठरविले. ही इच्छा त्यांनी आपली पत्नी भारतीबाई यांना बोलून दाखविली. भारतीबाई यांनीही मोठ्या खुशीने त्याला तयारी दाखविली. त्यासाठी काकुमाय बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. स्वत:ची दोन मुले आणि ही २५ ते ३० मतीमंद मुली असा संसार त्यांना गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. गुरुकुलनगरात त्यांनी एका इमारतीत हा संसार सुरू केला.
मतीमंद मुलींचे वर्तन समस्या कमी करून त्यांना त्यांच्या कुटूंबात व समाज प्रवाहात हक्काचे व सुरक्षेचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. ४ ते १२ वर्ष वयोगटातील मतीमंद मुलींचा ते सांभाळ करतात. नंदुरबार जिल्ह्यासह धुळे व जळगाव जिल्ह्यातील मुली देखील त्यांच्याकडे राहतात. आवश्यक ते सर्व शिक्षण ते त्यांना देत असतात. त्यासाठी काही सेवकांची देखील त्यांनी नियुक्ती करून घेतली आहे. याशिवाय मानसोपचार तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भौतिकोपचारतज्ज्ञ यांना ते नियमित बोलावून या मुलींची मानसिकता अधिकाधिक सुधरविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. येथे येणारे समुपदेशक विविध भागातील असतात.
गेल्या १० वर्षात शासनाचे कुठलेही अनुदान त्यांना मिळालेले नाही. स्वत:चा खर्च, सामाजिक संस्थांची मदत, दानशूर व्यक्तींचे सहकार्य या बळावरच त्यांनी आपला हा संसार चालविला आहे. वाढत्या खर्चात त्यांना मोठी कसरत करावी लागते.
अगदी स्वत:च्या दोन मुलांसारखे प्रेम ते या मुलांवर करतात. घरापासून लांब राहणारे व आपल्या वर्तनात रममान राहणाऱ्या या लेकरांना बापाची माया देणारे भास्कर कुवर या मुलींना त्यांच्या सख्या बापाचीही आठवण येऊ देत नाही. सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे त्यांनी ही सेवा सुरू ठेवली आहे. जोपर्यंत इच्छाशक्ती आहे तोपर्यंत सुरू राहणार असल्याचे भास्कर कुवर सांगतात.
घरात मतीमंद/गतीमंद बालक जन्माला आल्यावर आभाळ कोसळल्यासारखी स्थिती त्या कुटूंबाची होते. त्यामुळे अशा बालिकांची सेवा करण्याची इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यासाठी सुरुवातील अगदी १० बाय १० च्या घरात ही सेवा सुरू केली. त्यानंतर मोठे घर घेऊन तेथे ३० बालिकांची सेवा करीत आहोत.
-भास्कर कुवर, नंदुरबार.
अतीशय गरीब परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत. त्यामुळे गरीबांची सेवा करण्याची इच्छा होती. पतीने मतीमंद बालिकांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण मोठ्या खुशीने ती मान्य केली. दोन मुलींपासून आज आम्ही २५ ते ३० मुलींना लेकीसारखी माया देत आहोत. दाते त्यासाठी पुढे येतात.
-भारती कुवर, नंदुरबार.
रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण अनेक जण अपंग, मतीमंद यांना देखील आधार देत समाजसेवेच्या माध्यमातून त्यांना घडवत असतात.या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!